Advertisement

कोरोना चाचणीनंतरच वाहतूकदारांना एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रात्री १२ नंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली.

कोरोना चाचणीनंतरच वाहतूकदारांना एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश
SHARES

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये इतर राज्यातून जीवनावश्यक वस्तूंची आवक-जावक होत असते. त्यामुळे या ठिकाणी कोरोना फैलावाचा मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रात्री १२ नंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी आयुक्तांसमवेत परिमंडळ १ चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते. 

भाजीपाला मार्केटच्या बदललेल्या वेळेनुसार १० वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरातून ट्रकमधून भाजीपाला मार्केटमध्ये येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने येथील पाचही मार्केटमध्ये कामाच्या वेळांनुसार तिन्ही शिफ्टमध्ये कोव्हीड टेस्टींग करण्यात येत आहे. आयुक्तांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशव्दाराजवळील कोव्हीड टेस्टींग सेंटरचीही पाहणी केली व तेथील कार्यवाहीचा आढावा घेतला.

 या भेटीप्रसंगी मार्केट परिसरात गाळ्यांच्या अंतर्गत भागात फिरताना ट्रकमधून माल उतरविणाऱ्या व उतरवून घेणाऱ्या बहुतांश व्यक्तींकडे मास्क होते, मात्र, अनेकांच्या ते नाकाखाली अथवा गळ्यात लटकवलेले असल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास आलं. याबाबत तेथील सुरक्षारक्षक प्रमुखांना निर्देश देत आयुक्तांनी प्रवेशव्दारातून भाजीपाला घेऊन येणा-या ट्रकला प्रवेश देतानाच चालक, क्लिनर व ट्रकसोबत आलेले कामगार यांचा निगेटिव्ह कोव्हीड टेस्ट रिपोर्ट त्यांच्यासोबत आहे काय हे कटाक्षाने तपासण्याचे आदेश दिले.  त्यांच्याकडे रिपोर्ट नसल्यास त्यांची प्रवेशव्दाराजवळ लगेच ॲन्टिजन टेस्ट करून घ्यावी व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना व ट्रकला आत प्रवेश द्यावा असा आदेश आयुक्तांनी सुरक्षारक्षक पथकास दिला आहे. 

या पाहणीमध्ये केवळ महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान अशा इतर राज्यांतूनही भाजीपाला घेऊन याठिकाणी ट्रक येत असल्याची बाब आयुक्तांच्या प्रामुख्याने निदर्शनास आली. इतर राज्यांतून कोरोनाचा विषाणू नवी मुंबईत पसरू नये याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देत मार्केट आवारात प्रवेश देताना कोव्हीड टेस्टींग अधिक काटेकोरपणे बंधनकारक करावे याबाबत एपीएमसी प्रशासनाला निर्देश देण्यात आले. 



हेही वाचा -

एपीएमसी मार्केटमध्ये विशेष लसीकरण केंद्र सुरु

४५ वर्षावरील नागरिकांसाठी नवी मुंबई पालिकेचा 'ड्राइव्ह इन लसीकरण' उपक्रम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा