Advertisement

मुंबई काँग्रेसला राखायचंय विरोधीपक्ष नेतेपद!

भलेही शिवसेना-भाजपच्या भांडणात काँग्रेसकडे विरोधी पक्षपद आयतं चालून आलेलं असलं, तरी या पदाचा फायदा उचलत महापालिकेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे.

मुंबई काँग्रेसला राखायचंय विरोधीपक्ष नेतेपद!
SHARES

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला घवघवीत यश मिळत असल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच एका बाजूला येऊ घातलेल्या सर्वच निवडणुका तिन्ही पक्षांनी मिळूनच लढाव्यात, असा सूर आळवला जात असताना काँग्रेसने (congress) मात्र स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत या कारणावरून बिघाडी होणार काय? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

काही महिन्यांपूर्वी झालेली विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागा वाटून घेत लढवली होती. या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले होते. एकत्रित निवडणूक लढवल्यास भाजपला सहज पराभूत करता येऊ शकतं, याची जाणीव तिन्ही पक्षांतील नेत्यांना झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपापल्या प्रभाव क्षेत्रात निवडणूक लढवत या तिन्ही पक्षांनी मिळून १२ हजार पैकी सुमारे ७ ते ८ हजार ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. 

परिणामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेसोबतच औरंगाबाद, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका देखील हे तिन्ही पक्ष मिळून लढवू शकतात, असं म्हटलं जात असताना काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील वेगळी रणनिती आखावी लागणार आहे.

शिवसेनेसोबत राज्यातील सत्तेत सामील होण्यावरून सुरूवातीला भलेही काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असलं, तरी आता सत्तेची उब मिळत असल्याने सर्वच नेते सुखावले आहेत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. त्यामुळे मागील ७ ते ८ वर्षांपासून मरगळ आलेल्या पक्षाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे. 

मुंबई महापालिकेत (bmc) काँग्रेस सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. हे विरोधी पक्षपद भलेही शिवसेना-भाजपच्या भांडणात काँग्रेसकडे आयतं चालून आलेलं असलं, तरी या पदाचा फायदा उचलत महापालिकेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. किमान विरोधी पक्षनेतेपद तरी आपल्या हातात राहावं, यासाठी सर्व जोर पणाला लावायची तयारी काँग्रेसने केली आहे. 

सर्वच स्तरातील मतदारांमध्ये काँग्रेसचा जनाधार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये इतर पक्षांत विभागलेला जनाधार पुन्हा एकवटता यावा म्हणून मुंबईतील प्रत्येक वाॅर्डात लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाद्वारे वाॅर्डातील लोकांच्या समस्या सोडवण्यासोबतच मतदारांना आकर्षित करून घेण्याकडे काँग्रेस नेते मेहनत घेणार आहे.

काँग्रेसच्या या स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला देखील फटका बसू शकतो. याची जाणीव असल्याने तिन्ही पक्षांनी जनाधार वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा