अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते मात्र आता राष्ट्रावादीत फुट पडली आहे. अजित पवारांसोबत 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडखोरीनंतर आता संजय राऊतांनी सूचक विधान केलं असून महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच, हे होणारच होतं, असं सूचक ट्वीटही त्यांनी केलं आहे.
आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असून लवकरच एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील, असा दावा संजय राऊत यांनी करत यापुढे केंद्रीय तपास यंत्रणांचा आता काय तपास होईल, त्यात मला पडायचं नसल्याचे ते म्हणाले.
"महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, 'मी खंबीर आहे. लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.'. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.", असं राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
लवकरच शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील. शिवाय हा काही राजकीय भूकंप नाही, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एक इंजिन लावून आता तीन इंजिनाचा सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता एक इंजिन लावल्याने दुसरं इंजिन आपोआप बाहेर पडणार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही.
भविष्यात आम्ही सगळे एकत्र राहू, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करु असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. एकीकडे शिंदे गटाचा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता, मात्र घडले भलतेच. शिंदे गटातील लोकांचे चेहरे पाहिलेत का? त्यांची वेदना लक्षात आली असल्याचे राऊत म्हणाले. काही दिवसांपूर्वी जे सामनातून बोललो होतो, ते खरे ठरले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असून हे माझं भाकित नसून परफेक्शन असल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा