पहा, अमिताभ यांचा अफलातून लुक!

आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक बनलेले अमिताभ बच्चन यांनी नेहमीच वेगवेगळ्या गेटअपमधील भूमिका साकारल्या आहेत. आता त्यांचा आणखी एक अफलातून लुक समोर आला आहे.

चित्रीकरणात व्यग्र

रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखांना अचूक न्याय देण्यासाठी कोणत्याच प्रकारची तडजोड न करणाऱ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव कायम आघाडीवर आहे. या वयातही ते मेकअपसाठी एकाच जागी तासन तास बसतात. मेकअप आर्टिस्टला सर्वतोपरी सहकार्य करत चित्रपटातील व्यक्तिरेखेला आवश्यक असलेलं रूप धारण करतात आणि कॅमेऱ्यासमोर ती व्यक्तिरेखा साकारतात. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. मागील काही दिवसांपासून अमिताभ 'गुलाबो सिताबो' या आगामी हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटातील त्यांचा लुक समोर आला आहे. 

असा आहे गेटअप 

सुजित सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटासाठी अमिताभ यांनी हा खूपच वेगळा गेटअप केला आहे. थोडं मोठं नाक, वाढलेली दाढी, डोळ्यांवर चष्मा, कपाळाला आठ्या, डोक्यावर टोपी, त्या टोपीच्या वरून डोक्यापासून मानेपर्यंत गुंडाळलेला टॅावेल आणि कुर्ता परिधान केलेल्या रूपातील अमिताभ 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचे संकेत हा फोटो देतो. या चित्रपटात त्यांच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असून, दोघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. 

 कॅामन मॅनचा संघर्ष

हा चित्रपट पुढल्या वर्षी २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन जुही चतुर्वेदी यांनी केलं असून, रॅानी लाहिरी आणि शील कुमार यांनी रायझिंग सन फिल्म्स प्रॅाडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमिताभ यांच्या लुकचा 'सिलसिला' खूप जुना आहे. 'शहंशाह', 'अग्निपथ', 'आखरी रास्ता', 'खुदा गवाह', 'सूर्यवंशम', 'बूम', 'एकलव्य', 'झूम बराबर झूम', 'भूतनाथ', 'पा', 'बूढा होगा तेरा बाप' या चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गेटअपमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॅामन मॅनच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेले अमरीष मल्होत्रा कशा प्रकारे धमाल करतात ते आता पहायचं आहे.


हेही वाचा -

… आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?


पुढील बातमी
इतर बातम्या