अभिनेता सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानानं चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलं होतं. या CISF जवानाचं नाव सोमनाथ मोहंती आहे. कर्तव्य बजावणाऱ्या सोमनाथला बक्षिस देण्यात आलं आहे.
सलमानला विमानतळावर रोखल्यानं सोमनाथ अडचणीत सापडल्याचं वृत्त समोर आलं होतं. CISF नं मोहंती यांच्यावर प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. पण आता हे वृत्त निराधार असल्याचं सिद्ध झालं आहे.
सीआयएसएफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या प्रकरणात समोर आलेल्या चुकीच्या बातम्यांवर आक्षेप घेतला आणि लिहिलं, 'या ट्विटमध्ये नमूद केलेला कंटेट चुकीची आहे आणि त्यात तथ्य नाही. खरं तर, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याला कर्तव्य बजावताना व्यावसायिकता दाखवल्याबद्दल योग्य बक्षीस देण्यात आले आहे.'
रिपोर्टनुसार, सोमनाथ मोहंती यांनी ओडिशा इथल्या एका मीडिया हाऊससोबत बातचीत केल्यानं CISF नं त्यांचा मोबाइल जप्त केल्याचं वृत्त आलं होतं. मीडियाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. सोमनाथ मोहंती हे मूळचे ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
सीआयएसएफ अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी विमानतळावर सुरक्षा चौकशीसाठी सलमान खानला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर, नेटक-यांनी CISF चे ASI सोमनाथ यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याबद्दल कौतुक केलं होतं.
अनेकांनी सोमनाथ यांना रिअल सुपरहिरो देखील म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, एका यूजरनं कमेंट करताना लिहिलं होतं, 'सीआयएसएफच्या जवानानं ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.'
'टायगर 3' या चित्रपटात सलमान खानसह कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे युरोपियन देशात ४५ दिवसांचे शूटिंग शेड्युल आहे. चित्रपटात इम्रानची नकारात्मक भूमिका असेल.
इम्रानच्या एन्ट्री सीनला धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी १० कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचं वृत्त आहे. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. याशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससह 'किक 2', पूजा हेगडेसह 'कभी ईद कभी दिवाली' आणि आयुष शर्मासह 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटातही झळकणार आहे.
हेही वाचा