सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोलीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोशल मीडियातून द्वेषमूलक पोस्ट केल्याप्रकरणी कंगना रणौत हिच्याविरोधात खटला भरण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले होते. या समन्सनुसार तिने सोमवारी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहणं गरजेचं होतं. मात्र, ती हजर राहिली नाही. या प्रकरणी आता कंगना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी तिने केली आहे.
कंगनासह तिची बहीण रंगोलीविरोधात वांद्रे पोलिसात तक्रारदार मुनव्वर अली सय्यद यांच्या तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि रंगोलीविरोधात आयपीसी कलम १५३ अ, २९५ अ, १२४-अ नुसार एफआयआर दाखल करण्यात आला.
हेही वाचा -
यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी