गेल्या तीन दिवसांपासून अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणांभोवती निर्माण झालेल्या अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पती बोनी कपूर यांनी मुखाग्नी दिल्यानंतर श्रीदेवी अखेर अनंतात विलीन झाल्या आहेत. विलेपार्लेतल्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये सर्व कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यरात्री उशीरा पार्थिव आलं मुंबईत
मंगळवारी मध्यरात्री उशीरा श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून अनिल अंबानी यांच्या स्पेशल जेटने मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर ते ग्रीन एकर्स इथल्या लोखंडवालामधील त्यांच्या घरी नेण्यात आलं. बुधवारी सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीतील सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद अशा दक्षिणेकडील अनेक ठिकाणांहून चाहते आले होते.
पवनहंसजवळ चाहत्यांची मोठी गर्दी
दरम्यान, श्रीदेवी यांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. यावेळी सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त जमावाला आटोक्यात ठेवण्यासाठी तैनात करण्यात आला होता. इतकी प्रचंड गर्दी पाहून पुन्हा एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होतेय की काय? अशी भीतीही वर्तवण्यात येत होती.
अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भारतीय तिरंग्यामध्ये झाकण्यात आलं होतं. तसेच, गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
हेही वाचा