मुलगा वयात आला, की त्याच्या लग्नाची चिंता त्याच्यापेक्षा त्याच्या मित्रपरिवार आणि आप्तस्वकीयांना जास्त असते. हितचिंतकांना तर त्याहून जास्त! सलमान खानचंही सध्या असंच काहीसं झालंय. अर्थात, गेल्या 'अनेक' वर्षांपासून सलमान खानच्या लग्नाची चिंता त्याच्या चाहत्यांना आहे! अगदी भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांपेक्षाही सलमान खानचे त्याच्या गर्लफ्रेंडशी असलेले संबंध जास्त चर्चिले जातात.
सलमान खानने लग्नाबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे या सर्व चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे. सलमान खानने त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर 'मुझे लडकी मिल गई' असं ट्विट केलं आहे.
सलमानच्या या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अखेर सलमानच्या आयुष्यात 'ती' आली म्हटल्यावर चाहत्यांना आनंद झाला नसता तरच नवल! अनेकांनी लगेच तर्क वितर्क लावायलाही सुरूवात केली. अनेक अभिनेत्रींची नावं यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. पण सलमानच्या चाहत्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही!
आपल्या ट्वीटवरून तर्क वितर्क झाल्याचे पाहून सलमानने आणखी एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्याने 'ति'चा फोटोही शेअर केला. मात्र, फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे त्याच्या चाहत्यांची फार निराशा झाली. सलमानला लग्नासाठी नाही, तर 'लवरात्री' या चित्रपटासाठी मुलगी मिळाली आहे. वरिना असं त्या मुलीचं नाव आहे. सलमानची बहीण अर्पिता खान शर्माचा पती आयुष शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.