असा आहे वरुणचा 'कलंक'मधील अँग्री लुक

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेता वरुण धवननं नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या आव्हानात्मक भूमिका लीलया साकारल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तो करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील वरुणचा अँग्री लुक करणनं सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्हील केला आहे.

चेहऱ्यावर प्रचंड राग

करणच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'कलंक' चित्रपटातील वरूणचा फर्स्ट लूक दर्शवणारं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टर पाहिल्यावर हा वरुणच आहे की अन्य कोणी? असा क्षणभर संभ्रम झाल्याशिवाय राहात नाही. यावरूनच वरुणच्या या सिनेमातील व्यक्तिरेखेतील वेगळेपण जाणवतं. यात वरूण खूपच वेगळा दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे. हा राग कोणाविरोधात आणि कशासाठी आहे ते लवकरच समजेल.

लुक रिव्हील

'कलंक'मधील वरुणचा लुक शेअर करताना करणनं म्हटलं आहे की, 'जफरच्या लूकमध्ये वरूण धवन. जो आपल्या जीवनासोबत आणि धोक्यांसोबत फ्लर्ट करतो.' यावरून या सिनेमात वरुणचं नाव जफर असल्याचं समजतं. वरुणचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यापूर्वी वरुणनं 'कलंक'चा फर्स्ट लुक प्रदर्शित केला होता. या लुकमध्ये शिकारामध्ये बसलेली पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली एक पाठमोरी मुलगी आणि तिच्या मागं हातात वल्हा घेतलेला एक पगडीधारी पाठमोरा मुलगा दिसतो. त्या मागोमाग लगेचच वरुणचा लुक रिव्हील केल्यानं 'कलंक'बाबतची उत्सुकता वाढली आहे.

१९ एप्रिलला प्रदर्शित

१९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या 'कलंक'मध्ये वरुणसोबत माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर व कुणाल खेमू हे हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार दिसणार आहेत. वरुणचा लुक शेअर करण्यापूर्वी 'कलंक'चं पोस्टर शेअर करताना करणनं या सिनेमाविषयी थोडी माहितीही दिली आहे. करणने म्हटलं आहे की, या सिनेमाची कल्पना १५ वर्षांपूर्वी सुचली होती. या सिनेमावर माझा खूप विश्वास आहे. वडील सोडून जाण्यापूर्वी आम्ही दोघांनी या सिनेमावर एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा बनलेला त्यांना पाहायचं होतं, परंतु मी त्यांचं हे स्वप्न साकार करू शकलो नाही.

उत्सुक आणि भावूक

आता हा सिनेमा पूर्णत्वास आल्यानं त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. अभिषेक वर्मननं बनवलेल्या या प्रेमकथेला आता आवाज लाभला आहे. 'कलंक'च्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. त्यामुळं खूप उत्सुक आणि भावूकही झालो आहे. या प्रवासात तुम्हीही सामील होऊन 'कलंक'ला प्रेम द्याल, अशी आशाही करणनं व्यक्त केली आहे.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या