'गोदरेज प्रॉपर्टीज'ने विकत घेतला आर.के, स्टुडिओ

चेंबूरमधील ७० वर्षे जुना प्रसिद्ध आर. के. स्टुडिओ गोदरेज ग्रुपच्या 'गोदरेज प्रॉपर्टीज'नं विकत घेतला आहे. 'गोदरेज प्रॉपर्टीज'नं शुक्रवारी आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळं बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओचे नवे मालक ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ बनले असून त्याठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प होणार आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा

या स्टुडिओच्या विक्रीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. ‘२.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार असल्याची माहिती 'गोदरेज प्रॉपर्टीज' कंपनीनं दिली आहे. रणधीर कपूर यांनीसु्द्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण असून, या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडलं असल्याचं त्यांनी म्हटलं.

स्टुडिओची विक्री

स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळं त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळं कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. कपूर कुटुंबीयांनी एकमतानं स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असून स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक चित्रपटांची निर्मिती

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षानंतर १९४८ साली आर. के. स्टुडीओची स्थापना करण्यात आली होती.  आर. के. फिल्म्सनं बॉलिवूडला बरसात (१९४९), आवारा (१९५१), बूट पॉलिश (१९५४), श्री ४२० (१९५५), जागते रहो (१९५६) यांसारखे अनेक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. तसंच,  जिस देश में गंगा बेहती है (१९६०), ‘मेरा नाम जोकर’ (१९७०), बॉबी (१९७३), सत्यम शिवम सुंदरम (१९७८), प्रेम रोग (१९८२), राम तेरी गंगा मैली (१९८५) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती आर.के. स्टुडीओमध्ये करण्यात आली आहे.


हेही वाचा -

गुगलवर राजनंदिनीचा सर्वात जास्त शोध

भारतातील 'हे' महत्त्वाचे कायदे सर्वांना माहित पाहिजेच


पुढील बातमी
इतर बातम्या