धनत्रयोदशीला २० हजार कोटींची सोनेखरेदी!

यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात तब्बल २० हजार कोटी रुपयांची सोने खरेदी झाल्याची माहिती इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ने दिली आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, देशभरात यंदाच्या धनत्रयोदशीला सोन्याची तब्बल ४० टन विक्री झाली, या सोन्याची किंमत बाजारभावानुसार, २० हजार कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचंही आयबीजेएने म्हटलं आहे.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी धनत्रयोदिशीला सुमारे १२ हजार कोटी रुपयांची सोने विक्री झाली होती. तर यावर्षी हा आकडा २० हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. वर्षभरात सोन्याची किंमत ७० टक्क्याने वाढूनही धनोत्रयोदशीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के विक्री वाढली आहे. 

हेही वाचा- दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचं महत्त्व

लॉकडाऊन असल्याने मागील ८ महिन्यांत ग्राहकांना सोने खरेदी करता आली नव्हती. सोन्याचे दागिने खरेदी करता आले नव्हते. परंतु आता सर्व व्यवहार सुरू झाल्याने ग्राहकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. शिवाय ज्वेलर्सकडूनही आकर्षक ऑफर्स मिळाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदी करण्याकडे आकर्षित झाले. लवकरच लग्नाचा मोसम सुरु होईल. या काळातही सोन्याच्या मागणीत वाढ होईल, असं सुरेंद्र मेहता यांनी सांगितलं.

सोन्याच्या भावाने  प्रतितोळा ५६ हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. परंतु आता भावात घसरण झाली आहे. तरी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होण्याचा शक्यता आहे, अशी माहिती सुरेंद्र मेहता यांनी दिली.

शुक्रवारी देशभरातील स्पॉट मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची सरासरी किंमत ५०,८४९ रुपये प्रति १० ग्रॅम (बिना जीएसटी) होता. तर आदल्या दिवशी हाच भाव ५०,७०२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तर, २२ कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ५०,६४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. जो एक दिवसापूर्वी ५०,४९९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
पुढील बातमी
इतर बातम्या