पीएमसी घोटाळा : दलजीत बल यांच्या घरावर खातेदारांचा मोर्चा

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादून १०० दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही बँकेच्या खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे खातेदार संतप्त झाले आहेत. संतप्त खातेदारांनी रविवार  बँकेचे संचालक दलजीत बल यांच्या अणुशक्तीनगर येथील घरावर मोर्चा काढला. यावेळी दलजीत बल यांच्याविरोधात घोषणा देत त्यांना अटक करण्याची मागणी केली. 

अणुशक्तीनगर बस डेपो ते दलजीत बल यांच्या माउंट व्ह्यू या घरापर्यंत खातेदारांनी मोर्चा काढला होता. यावेळी दलजीत बल यांच्या फोटोला पादत्राणांचा हार घातलेले फलक खातेदारांनी घेतले होते. पोलिसांनी घराजवळ मोर्चा अडवला. मोर्चातील महिलांनी दलजीत बल यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे खातेधारक व पोलीस यांच्यात वाद झाला. यावेळी खातेदारांनी घराच्या प्रवेशद्वाराजवळ चोर असं लिहिलं. 

खातेधारकांनी दलजीत यांचे फोटो यावेळी जाळले. यानंतर दलजीत यांच्या प्रवेशद्वाराबाहेर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यामुळे अणुशक्तीनगर येथून ट्रॉम्बेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. पीएमसी बँकेत अनेक गुरुद्वाराचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे दलजीत बल याने शीख समुदायाशी गद्दारी केल्याचं खातेदारांनी म्हटलं. पोलिसांनी दलजीत बल याला लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा मोठं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


हेही वाचा- 

१२ कोटींचं हेरॉइन जप्त, दोघांना अटक

मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने हरवल्या बंदुकीतल्या ३० गोळ्या


पुढील बातमी
इतर बातम्या