ICUमधील ९६ टक्के रुग्ण डोस न घेतलेले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणाच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षाव्यवस्था तातडीनं केली जात आहे. अशातच एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या ९६ टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई शहर उपनगरांत १८६ रुग्णालयांत दाखल असलेले १९०० रुग्ण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत असून, त्यांचे लसीकरण झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. लस घेतलेल्यांमध्ये कोरोना किंवा डेल्टा, ओमायक्रॉन संसर्ग हा अतिदक्षता विभागापर्यंत जात नसल्याचंही महापालिकेनं नमूद केले. म्हणजेच लसीकरण झालेले असल्यास सौम्य संसर्ग किंवा लक्षणविरहित रुग्ण दिसून येत असल्याचं समजतं.

रुग्णालयात दाखल करण्याचे रुग्णांचे प्रमाण वाढल्यास आणि ऑक्सिजनची गरज अधिक भासल्यास त्वरित लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईत कोरोनाच्या २ लाटा आल्या आहेत. या दोन्ही लाटा थोपवल्यावर डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना आटोक्यात असताना ३० नोव्हेंबरपर्यंत मुंबईत एकूण ७ लाख ६२ हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरानंतर ६ जानेवारीला एकूण ८ लाख ५३ हजार ८०९ रुग्णांची  नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत कोरोनाच्या ९० हजार ९२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या