चेंबूरमधील माहुलगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी ३.०३ वाजता हा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत ही आग विझवली. या स्फोटात एकूण ४३ जण जखमी झाले, त्यापैकी २२ जणांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलं. तर २१ कामगारांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी १ जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे माहुल परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं.
या आग प्रकरणी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.
भारत पेट्रोलियमच्या हायड्रो क्रॅकर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. स्फोट होताच संपूर्ण माहुल गावासहित सायन परिसरात हादरा बसला. या स्फोटात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. स्फोट झाला त्यावेळी रिफायनरीत २०० ते ३०० कामगार कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षीतरित्या बाहेर काढण्यात आलं.
स्फोटात एकूण ४३ जण जखमी झाले. त्यातील २२ जखमींना बीपीसीएलच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेऊन औषोधोपचार केल्यावर सोडण्यात आलं. तर उरलेल्या २१ जणांना चेंबूरच्या इन्लॅक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यापैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळत असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
भारत पेट्रोलियमच्या प्लांटच्या बाजूलाच आदिवासी वसाहत असल्यामुळं या स्फोटामुळं परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरणं निर्माण झालं होतं. त्याचप्रमाणं कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून आग नियंत्रणात आणण्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करत होते.
'बीपीसीएल' रिफायनरीच्या हायड्रोजन टँकचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. ही आग तिसऱ्या लेव्हलची आहे. प्राथमिक माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. फोम टेंडर आणि वाॅटर टँकरच्या माध्यमातून आग विझवण्यात आली.
- प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी
'बीपीसीएल'सोबतच 'एचपीसीएल', 'आरसीएफ', माझगाव डॉक आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.