पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी पत्राचाळ सहकारी गृहनिर्माण संस्था (सोसायटी)ला अखेर उपनिबंधकांनी दणका दिला आहे. 'सोसायटीने कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याचे' म्हणत उपनिबंधकांनी पत्राचाळ सोसायटी बरखास्त करत प्रशासकाची नेमणूक केली आहे. सोसायटीवर ८ डिसेंबरला प्रशासक नेमण्यात आला असून यासंबंधीच्या पत्राची प्रत 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.
गोरेगाव येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. गुरूआशिष बिल्डरने एकीकडे या पुनर्विकासाद्वारे म्हाडाला १००० कोटींचा चुना लावला आहे, तर दुसरीकडे रहिवाशांना आठ वर्षांपासून वाऱ्यावर सोडले आहे. या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन प्रकल्प रद्द करत ताब्यात घेण्याचे आदेश १९ दिवसांपूर्वी म्हाडाला दिले आहेत. त्याचवेळी बिल्डरविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह या प्रकरणाच्या ईडी चौकशीचेही आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या एका कार्यकारी अभियंत्यालाही निलंबितही करण्यात आले होते.
पत्राचाळप्रकरणी आतापर्यंत मूग गिळून गप्प असलेले मुंबई मंडळ मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अखेर जागे झाले आहे. त्यानुसार मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी पत्राचाळ सोसायटीला भाडेवसुलीसंबंधीचा अहवाल दोन दिवसांत सादर कऱण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल सोसायटीने दिला का? त्या अहवालात नेमके काय आहे? हे मंडळाकडून गुलदस्त्यात ठेवले जात आहे.
दरम्यान, मंडळाने सोसायटीविरोधात थेट उपनिबंधकांकडे तक्रार करत सोसायटी बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, उपनिंबधकांनी ८ डिसेंबरला सोसायटी बरखास्त करत सोसायटीला मोठा दणका दिला आहे. सोसायटीने बायलॉजचे उल्लंघन केले असून कर्तव्यात कसूर केली आहे, तर सोसायटीचे सदस्य, पदाधिकारी सोसायटी चालवण्यासाठी अपात्र असल्याचे ताशेरे उपनिबंधकांनी ओढले आहेत. आता प्रशासक म्हणून क्लास टू ऑफिसर डी. आर. पाटील, सहाय्यक अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
आता दैनंदिन सोसायटीचे काम प्रशासकाकडून पाहिले जाणार असून, त्यामुळे लवकरच पत्राचाळ सोसायटीने केलेले घोटाळे बाहेर पडतील, असे म्हणत पत्राचाळीतील रहिवाशी पंकज दळवी यांनी उपनिबंधकांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.