बीडीडी चाळीतील बायोमेट्रिक्स सर्व्हेक्षणाला 17 मे 2017 पासून सुरुवात होणार आहे. जर या सर्वेक्षणास चाळधारकांनी योग्य सहकार्य केल्यास बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामास वेग येईल. नायगावमध्ये 42 चाळ इमारती आहेत. यातील नागरिकांनी संक्रमण शिबिरात जाण्याची तयारी दाखवली तर, येत्या दोन वर्षात येथील काम पूर्ण होईल. अन्यथा 19 वर्षांचा कालावधी या कामास लागेल असे स्पष्टीकरण भाजपा नेते सुनिल राणे यांनी चाळधारकांना दिले. झोपडपट्टीचा कायदा न लावता भाडे पावती धारकास ग्राह्य धरून घर देण्यात येणार असून येत्या दोन दिवसात शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे. यावर म्हाडाचे चिन्ह असणार आहे. याची नोंद म्हाडाकडे रीतसर ठेवण्यात येणार असल्याने कोणत्याही चाळधारकाची फसवणूक यामुळे होणार नाही. त्यामुळे सर्व चाळधारकांनी हे शुद्धीपत्रक भरायचे आहे, असा सल्ला आमदार कालिदास कोळंबकर यांनी सदर सभेत चाळधारकांना दिला.
या मार्गदर्शनानंतर काही नागरिकांनी पुनर्विकासाबाबत आपल्या शंका उपस्थित करत बायोमेट्रिक पद्धतीने होणाऱ्या सर्वेक्षणाला विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. कॉरफरस फंड 1 लाख ऐवजी किमान 10 लाख तरी देण्यात यावा, भूमिगत पार्किंग सार्वजनिक असणार का? यावर किती शुल्क आकारणार असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत येथील चाळधारकांनी आधी लिखित स्वरूपाचा करार याबाबत करा, ज्यामध्ये 500 चौ. फुटांचे घर असेल आणि आपण देत असलेल्या सुविधा तोंडी नव्हे तर लिखित द्या तेव्हाच आम्ही या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला पाठिंबा देऊ, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा चाळधारकांनी दिला आहे.