भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा मृत्यू,

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अद्याप ही आग आटोक्यात आली नसून, सध्यस्थितीत अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही दाखल झाल्या असून, त्यांनी बचावकार्य वेगानं करण्याचे आदेश दिले आहेत.

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्यानं ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते.

भांडूपमधील अग्नितांडवात आतापर्यंत ६१ जणांना बाहेर सुखरूप काढण्यात आलं. तर ४ जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या ४ ही बाजूला आग पसरल्यानं अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाच्या २० गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.


हेही वाचा - 

दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता

बँकेची सर्व कामं लवकर करा, ७ दिवस बँका बंद


पुढील बातमी
इतर बातम्या