महापौर, उपमहापौर वगळता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी

महापालिकेतील कर्मचाऱ्याप्रमाणे आता नगरसेवकांनाही बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे. यांत केवळ महापौर आणि उपमहापौर यांनाच सूट असेल. महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर बायोमेट्रिक हजेरी मशीन लावण्यात येईल. या हजेरीची नोंद महापालिकेच्या चिटणीस विभागाद्वारे ठेवण्यात येणार आहे.

गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर महापौर व उपमहापौर यांना वगळून नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन्ससह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकी घेण्यात आला.

सध्याची पद्धत काय?

सद्यस्थितीत महापालिकेच्या सभांना उपस्थित राहणारे नगरसेवक सभागृहाबाहेर ठेवलेल्या हजेरी वहीत स्वाक्षरी करून सभागृहात येतात. परंतु बऱ्याच वेळेस नगरसेवक हजेरी वहीवर स्वाक्षरी करून सभागृहात उपस्थित न राहता परस्पर निघून जातात.

कारण काय?

त्यामुळे महापालिका सभागृहाच्या दरवाज्यावर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन्स बसवून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. चिटणीस विभागानेही याबाबतची प्रक्रिया सुरु केली असल्याचं समजतं.

विधी समिती व सभागृहाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंलबजावणी महापालिका चिटणीस विभागाच्या माध्यमातून केली जाईल, असं उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक यांनी स्पष्ट केलं.

  • कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात: १५ एप्रिल २०१७
  • हजेरीपट बंद करण्यात आलेली तारीख: १५ जुलै २०१७
  • मुंबईतील एकूण नगरसेवक: २३२
  • महापालिकेच्या मासिक सभा: ३ ते ५


हेही वाचा-

नगरसेवकांची हजेरीही आता आधारकार्डला जोडून बायोमेट्रिकद्वारे!

इंटरनेट बंद, आयुक्त कार्यालयात नोंदवू देईनात बायोमेट्रिक हजेरी


पुढील बातमी
इतर बातम्या