मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयावरून भाजपाच्याच २ नगरसेवकांमध्ये जुंपली!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुलुंड मधील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या कामावरून आता भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपलीय. या रुग्णालयाच्या पुनर्बांधणी कामाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. परंतु, हे रुग्णालय ज्या भागात येते, त्या भागाच्या स्थानिक भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांनी मात्र, 'आपण यासाठी पाठपुरावा करत असून गंगाधरे यांना आंदोलन करण्याचा अधिकार कुणी दिला?' असा सवाल करत आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाला आव्हान दिलं आहे.

गंगाधरेंचं परस्पर लाक्षणिक उपोषण?

मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्विकास व अत्याधुनिकीकरणास न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याचे होणारे हाल याबाबत मुलुंडकरांच्या हक्काबाबत भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले होते. या उपोषणाला खासदार किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंह यांच्यासह भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून 'सोमवारी महापालिका मुख्यालयात बैठक बोलावून त्यावर तोडगा काढला जावा', अशी विनंती केली. त्यानंतर गंगाधरे यांनी उपोषण मागे घेतले.

'वॉर्डात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?'

मात्र, सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत गंगाधरेच गैरहजर राहिले. खासदार किरीट सोमय्या, गटनेते मनोज कोटक यांच्यासह मुलुंडमधील सर्व भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. परंतु उपोषण करणारे गंगाधरे हेच गैरहजर राहिल्याने यामागील चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी गंगाधरे यांना याचा जाब विचारत 'माझ्या वॉर्डात तुम्ही हस्तक्षेप करणारे कोण?' असा सवाल केला आहे. 'या रुग्णालयासाठी आपण प्रथमपासून पाठपुरावा करत असून गंगाधरे यांनी आपल्याला विश्वासात न घेता परस्पर उपोषण करून एकप्रकारे गैरवर्तन केले' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खासदारांना कल्पना देऊनच उपोषण?

याबाबत समिता कांबळे यांनी थेट खासदारांसह वरीष्ठ पातळीवर तक्रार केल्यानेच गंगाधरे यांनी या बैठकीला जाणे टाळल्याचे बोलले जात आहे. 'महापालिकेकडे ५० टक्के अधिक दराने निविदा आल्यानेच ते रद्द करण्यात आले आहे. हे योग्य असून एवढ्या अधिक दराने कंत्राट देऊन करदात्यांच्या पैशांचे नुकसान करावे याला भाजपाचे नगरसेवक म्हणून आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही', असेही कांबळे यांनी खासगी म्हटल्याचे समजते. मात्र, गंगाधरे यांनी 'आपण खासदारांना कल्पना देऊनच हे उपोषण केल्याचे' सांगितल्याने मुलुंडमधील भाजपाच्या नगरसेवकांमधील वाद आता समोर येत आहे. दरम्यान, समिता कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

भाजपाच्या २ नगरसेवकांमध्ये जुंपली

मुलुंड अग्रवाल रुग्णालयाच्या पुनरबांधणी बाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात खासदार किरीट सोमय्या यांच्या सोबत झालेल्या बैठकीला मी पालघर निवडणुकीच्या मतदानामुळे उपस्थित राहू शकलो नाही. पक्षाचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेश असल्याने मतदान सुरू असताना मी तो मतदार सोडणे आवश्यक समजलो नाही. खुद्द खासदारांनी, आपण तिथे राहा, मी इथे आहे, असे सांगत मला या बैठकीला नाही आलो तरी चालेल, असे सांगितले होते. म्हणून मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मी नसलो तरी खासदार, आमचे गटनेते व पक्षाचे नगरसेवक होते. हे आंदोलन माझे एकट्याचे नव्हते, तर पक्षाचे होते.

- प्रकाश गंगाधरे , भाजपा नगरसेवक

पुढील बातमी
इतर बातम्या