मुंबईतील महापालिकेच्या मालकीच्या एकूण १०८ इमारती अतिधोकादायक अाहेत. मात्र, यामधील केवळ ४१ इमारतीच जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्यावतीने इमारत खाली करण्याच्या नोटीसा प्राप्त झाल्यानंतर भाडेकरूंनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले अाहेत. त्यामुळे तब्बल ५६ इमारती न्यायप्रविष्ठ असल्याने त्या इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत.
लेखा परिक्षण शिल्लक
पावसाळ्यात मुंबईतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. उपकरप्राप्त, खासगी तसेच महापालिकेच्या मालमत्ता अशा सर्व इमारतींचा यामध्ये सामावेश असतो. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींचं सादरीकरण सुधार समितीच्या सभेपुढे मालमत्ता विभागाच्यावतीनं करण्यात आलं. उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी या महापालिकेच्या मालमत्तांची माहिती देत अतिधोकादायक इमारती पाडण्यासंदर्भातील आकडेवारी सादर केली.
मुंबईत महापालिकेच्या एकूण ३ हजार ८३ इमारती आहेत. यापैकी तळमजल्यांसह बहुमजली असलेल्य ७६५ इमारतींच्या बांधकामांचे लेखा परिक्षण करण्यात आलेलं आहे. तर ६३९ इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मात्र, अजुनही १ हजार ६७९ इमारतींच्या बांधकामांचे लेखा परिक्षण करण्याचं काम शिल्लक असल्याची माहिती चौरे यांनी सुधार समितीला दिली.
२४६ कामांचे कार्यादेश
इमारतींच्या बांधकामांचं लेखा परीक्षण केलेल्या ७६५ इमारतींपैकी १०८ इमारती या धोकादायक अवस्थेत होत्या. त्यातील ४१ इमारती पाडण्यात आल्या आहेत. ९ इमारती या विभागामार्फत पाडण्यात येत आहेत. दोन इमारती विकासकामार्फत पाडण्यात येणार आहेत. तर ५६ इमारतींचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. तर काही इमारतींची दुरुस्ती करण्यात येत आहे. हाती घेण्यात आलेल्या २८५ कामांपैकी २४६ कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहे. त्यातील १९६ कामे ही पूर्ण झालेली आहेत. तर ३८ कामे ही निविदा प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
प्लास्टिक बंदी : रविवारी दुपारपर्यंत ४९० किलो प्लास्टिक जप्त