पावसाळ्यात विविध दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी प्रचंड पाणी तुंबतं. त्यामुळं वाहतूक कोंडी आणि लोकांना प्रवासादरम्यान मोठ्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. तसंच, काही ठिकाणी खोदकाम केलेलं असल्यानं पाणी तुंबल्यामुळं त्या खोदकामाचा लोकांना अंदाज येत नाही आणि लोक खड्ड्यात पडून अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळं यंदाच्या पावसळ्यात अशा दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.

शुक्रवारी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध सरकारी यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नालेसफाई, धोकादायक इमारती, पाणी तुंबणारी ठिकाणं याबाबत घ्यावयाची काळजी तसंच सर्व सरकारी यंत्रणांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली.

विविध अधिकारी उपस्थित

विविध सरकारी यंत्रणांच्या या आढावा बैठकीमध्ये पोलिस आयुक्त संजय बर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय रेल व्यवस्थापक एस. के. जैन, अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, . एल. जऱ्हाड, डॉ. अश्विनी जोशी, 'बेस्ट'चे उपमहाव्यवस्थापक आर. जे. सिंग तसंच म्हाडा, एमएमआरडीए, नौदल, लष्कर, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवामान खातं, विमानतळ प्राधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

३९८ अतिधोकादायक इमारती

मुंबईत एकूण ३९८ अतिधोकादायक इमारती आहेत. यांपैकी घाटकोपरमध्ये ६४, अंधेरी व जोगेश्वरी पश्चिममध्ये ५१ आणि मुलुंडमध्ये ४७ इमारती आहेत. यापैकी १५९ इमारतींचे वीज-पाणी तोडणार आहेत. तसंच, १९३ इमारतींची प्रकरणं न्यायप्रविष्ट तर ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी होऊ नये यासाठी पालिका आयुक्त यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

३१ मेपर्यंत नालेसफाई

शहर आणि उपनगरातील २५४.६४ किमी लांबीच्या मोठ्या नाल्‍यांमधून ३,४९,०५० टन गाळ काढायचा आहे. त्यामधील १४ मेपर्यंत २,४४,३३५ टन गाळ काढण्‍यात आला आहे. ४४३.८५ किमी लांबीच्या छोट्या नाल्‍यांमधून ३,०९,७७७ टनांपैकी २,१६,८४३ टन गाळ काढण्‍यात आला असून, ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक

सर्व चौपाट्यांवर मिळून ९३ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीसाठी गोवालिया अग्निशमन केंद्र, दादर चौपाटीसाठी शिवाजी पार्क अग्निशमन केंद्र, जुहू चौपाटीसाठी गोरेगाव अग्निशमन केंद्र, वर्सोवा चौपाटीसाठी चिंचोली अग्निशमन केंद्र, अक्सा चौपाटीसाठी मालाड अग्निशमन केंद्र आणि गोराई चौपाटीसाठी दहिसर अग्निशमन केंद्र येथे पॉवरबोट, जेट स्की आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ येत्या आठवडाभरात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यता आले आहेत.

पालिका शाळांमध्ये निवासस्थानं

पावासाळ्यात संभाव्य दुर्घटना अथवा पाणी साचल्यामुळं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती निवासस्थानं ठेवण्यात आली आहेत.

खासगी वृक्ष छाटणी

खासगी जागेवर असलेल्या झाडांमुळं लोकल फेऱ्यांना अडथळा निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी ४७ खासगी हद्दीतील वृक्ष छाटणीसाठी परवानगी देण्याची सूचना रेल्वे प्रशासनानं पालिकेला केली. त्याचबरोबर रेल्वे रुळांवरील साचणारं पाणी उपसण्यासाठी यंदा २७ उच्च क्षमतेचे पंप बसवण्याची सूचना मध्य रेल्वेनं पालिकेला केली. रेल्वे स्थानकांदरम्यान ७८ कल्व्हर्टची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. रेल्वे विभागात गतवर्षीच्या तुलनेत ३७ अतिरिक्त पाणीउपसा पंप उभारण्यात येणार आहे. गतवर्षी ४२ पंप बसवण्यात आले होते.

सुरक्षा बलांचे कर्मचारी तैनात

रेल्वे स्थानकांतील गर्दीच्या नियोजनासाठी एकूण ५१० रेल्वे सुरक्षा बलांचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यांपैकी २५८ कर्मचारी सध्या तैनात करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवरील बहुतांशी स्थानकांत प्लॅटफॉर्मवरील छताचं काम सुरू आहे. मान्सून येण्याआधी सर्व स्थानकांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य यंत्रणा सज्ज

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पालिका रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांच्या नियंत्रणाकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मॅनहोलवर संरक्षक जाळ्या

नौदल, भारतीय लष्कर, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना आपत्कालीन परिस्थितीला समोरं जाण्यासाठी आवश्यक ती सामुग्री व साधनांसह कार्यान्वित केलं जाणार आहे. दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हाडा व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून संरक्षक भिंती व जाळ्या बसविण्यात येणार आहेत. तसंच सर्व मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.


हेही वाचा -

पुढच्या ४८ तासांत मुंबईतील तापमान वाढण्याची शक्यता

'बाबो'चा ट्रेलर अन् 'याना'चा गोंधळ


पुढील बातमी
इतर बातम्या