पवई तलावात जाळे टाकून मासेमारीवर बंदी घाला, स्थायीची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

पवई तलावातील मासे पकडण्यास बंदी असली तरी याठिकाणी जाळे टाकून मासेमारी करण्यास बंदी नाही. त्यामुळे या तलावात जाळी टाकून मासेमारी करण्यावरही बंदी घातली जावी, अशी मागणी स्थायी समितीने केली आहे.

निविदेला स्थगिती

पवईतील तलाव क्षेत्र हे मगरीचे उद्यान म्हणून घोषित केलं जावं आणि या तलावाच्या परिसरात सांडपाणी सोडण्यास आणि मासे पकडण्यास बंदी घालण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे तत्कालिन विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली होती. यावर मगरींसाठी स्वतंत्र उद्यान विकसित करण्यासाठी चर्चा झाली असून उद्यानाऐवजी तलावात बास्कींग क्षेत्र म्हणून विकसित करावं, असं सूचवलं आहे. परंतु, पवई तलाव हे प्रस्तावित मेट्रो ६ने बाधित होत असल्यानं त्या निविदा सध्या स्थगित ठेवण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

यावर बंदी घाला

या प्रस्तावावर बोलताना शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांनी या ठिकाणी जाळे टाकून मासेमारी करण्यास बंदी नसून त्यावर बंदी घातली जावी, अशी सूचना केली. तर माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी, याठिकाणी किती हाऊसबोट असून त्यातील कितींना परवानगी दिली आहे, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी सूचना केली. त्यामुळे सदस्यांच्या सूचनांची दखल घेऊन त्यांची उत्तरं देण्याचे आदेश प्रशासनाला देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव पुन्हा आयुक्तांकडे पाठवून दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या