प्लास्टिक बंदीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून धोरण बनवण्यात आले आहे. याअंतर्गत प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करण्याची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार असून ही तपासणी करताना कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी विषयक नियोजनात्मक बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. उपायुक्त (विशेष) निधी चौधरी, उपायुक्त रमेश पवार, सहाय्यक आयुक्त (बाजार) डॉ. श्रीमती संगीता हसनाळे व महापालिकेचे कायदा अधिकारी जेरनॉल्ड झेवियर यांच्यासह संबंधित खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना, कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याने आपल्या गणवेशावर ‘नेम-प्लेट’ लावणे बंधनकारक करण्यात यावे. तसेच, या कारवाई दरम्यान तसेच कर्तव्यावर असताना प्रत्येक वेळी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे देखील आवश्यक असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करतानाच प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी तसेच कागदी पिशव्या जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी महिला बचत गटांच्या सहकार्याने कापडी वा कागदी पिशव्या तयार करण्याबाबत महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही निश्चित करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महापालिकेच्या मंडयांमध्ये कापडी व कागदी पिशव्या सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने मंडयांमध्ये गाळे उपलब्ध असल्यास तिथे कापडी/कागदी पिशव्या विकण्याची व्यवस्था करून दिली जावी, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
प्लास्टिक बंदी राबवत असतानाच घरात असलेल्या प्लास्टिकचे काय करावे? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्लास्टिक जमा करण्याच्या दृष्टीने महापालिक मंडया(मंड्या), सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात संकलन पिशव्या (कलेक्शन बिन्स) ठेवण्यात येणार आहेत.
ज्या व्यक्ती, संस्था किंवा समूह कापडी वा कागदी पिशव्या तयार करत असतील, तर त्यांचा तपशील नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र 'वेबपेज' तयार केले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त (नियोजन) खात्याद्वारे करण्यात येणार आहे. याबाबत इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांच्याशी ८२९१६५२९७९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा