मुंबईत महापालिकेच्या बाईक अॅम्ब्युलन्स नाहीच!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईत महापालिकेकडून बंगळुरु शहराच्या धर्तीवर पॅरामेडिकल प्रशिक्षण पूर्ण केलेला चालक असलेली बाईक अॅम्ब्युलन्स सुरु करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबईत १०८ दूरध्वनी क्रमांकाद्वारे बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध असल्यामुळे अशा प्रकारची सेवा सुरु करणे सद्यस्थितीत आवश्यक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत १० बाईक अॅम्ब्युलन्स

पालिकेची बाईक अॅम्ब्युलन्स सुरु करण्याची मागणी तत्कालीन सभागृहनेत्या व विद्यमान नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. याला तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही पाठिंबाही दिला होता. राज्य शासनाने मुंबईत प्रायोगिक तत्वावर१० बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा सुरु केली आहे. मुंबई शहरामध्ये पहिल्या टप्प्यात भांडुप, मालाड, धारावी, नागपाडा, चारकोप, गोरेगाव, ठाकूर व्हिलेज, कलिना व खार-दांडा आदी ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या बाईक अॅम्ब्युलन्सची गरज नाही

राज्य शासनाच्या १०८ क्रमांकावरील सेवेप्रमाणे मुंबईत बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करता येणार नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले. राज्य शासनाकडून आधीच मुंबईत अशा प्रकारच्या अॅम्ब्युलन्स पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजून अॅम्ब्युलन्सची आवश्यकता नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत १०८ दूरध्वनी क्रमांकावर सुमारे २५० रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

मुंबईतील अॅम्ब्युलन्सची सद्यस्थिती

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भाडेतत्वावर अॅम्ब्युलन्स केईएम, नायर, शीव, कूपर रुग्णालय, चेंबूरनाका, चिता कॅम्प, भांडुप व विक्रोळी प्रसूतीगृह उपलब्ध आहेत. याशिवाय सद्यस्थितीत केईएम, शीव आणि नायर रुग्णालयासह शिवडी क्षयरोग रुग्णालय आणि सातरस्ता रुग्णालय आदी ठिकाणी भाडेतत्वावर अॅम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालय येथेही भाडेतत्त्वावर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जात आहे. कूपर रुग्णालयात देणगी स्वरुपात अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली आहे. मात्र, १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी क्रांतीवीर महात्मा ज्योतिब फुले रुग्णालय व वांद्रे भाभा रुग्णालय येथील अॅम्ब्युलन्सचे आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे त्या आता भंगारात जाणार आहेत.


हेही वाचा

...तर अॅम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकणारच नाही!

पुढील बातमी
इतर बातम्या