मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं, तानसा धरण ओव्हरफ्लो

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण गुरूवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी काठोकाठ भरून वाहू लागलं. याआधी तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांपैकी २ धरणं ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.

१० टक्के पाणीकपात मागे

जूनमध्ये विशेष पाऊस न पडल्यामुळे १० टक्के पाणीकपात झेलणारे मुंबईकर चिंताग्रस्त झाले होते. परंतु जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला आणि जुलैमध्येही कोकणसह मुंबईत खासकरून धरणक्षेत्रांत चांगला पाऊस पडल्याने ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच धरणांतील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपात मागे घेतली होती.

इतका पाणीसाठा जमा

शहापूरजवळील तानसा तलावातून मुंबईला दरोज सुमारे ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तानसा धरणाची क्षमता १२८.६२ मीटर टीएचडी इतकी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये एकूण १४.५० दशलक्ष लिटर पाणी साठवलं जातं. सद्यस्थितीत या सातही तलावात ८ लाख ३७ हजार ३९५ लक्ष लिटर्स म्‍हणजेच साधारणतः ५७.८६ टक्‍के पाणीसाठा जमा झालं आहे.  


हेही वाचा-

तानसा, वैतरणा ओव्हरफ्लो, गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईजवळील या '५' धबधब्यांवर लुटा मनमुराद आनंद


पुढील बातमी
इतर बातम्या