महापालिकेच्या डोळ्यावर झापड कायम, मुंबईतील पुलांचं ऑडिट पुन्हा देसाईकडे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला तर, ३१ हून अधिक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर निरजकुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. मात्र, मुंबई महापालिका प्रशासनानं पुन्हा या दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज असोसिएट या कंपनीच्या भरवशावर मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळं पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुन्हा देसाईचा सल्ला

हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेस कंपनीला काळ्या यादीत टाकून पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यातच ऑडिटर देसाईनं केलेल्या इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असं असताना देखील पालिकेनं एबीसीडी आणि ई विभागातील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी डी.डी. देसाईज कंपनीनं तयार केलेल्या ऑडिटचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

येत्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू आणि ३१ हून अधिक जण जखमी झाले, तरी देखील पालिका डी. डी. देसाईनं दिलेल्या बनावट ऑडिटनुसार इतर पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला घेते कसा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच, महापालिकेच्या या प्रस्तावामुळं पुन्हा वाद होण्याचा शक्यता आहे.

या पुलांची दुरूस्ती

मुंबईतील ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल, ऑपेरा हाऊस पूल, फ्रेंच पूल, हाजीअली भुयारी मार्ग, फॅाकलॅन्ड रोड (डायनाब्रिज), प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, सीएसटी भुयारी मार्ग, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्रीवे, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, वाय. एम. उड्डाणपूल, सर पी डिमेलो पादचारी पूल, डॅाकयार्ड रोड पादचारी पूल, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईचा पुन्हा सल्ला घेण्यात येणार आहे.


हेही वाचा -

रेल्वे स्थानकावरील कँटीनमधील लिंबू पाणी पिताय, तर हे वाचा...

राज्यभरात लोकसभा निवडणूकीसाठी ३ लाख शाईच्या बाटल्या


पुढील बातमी
इतर बातम्या