पावसाळ्यात मुंबई तुंबण्यास बीएमसीच जबाबदार, कॅगचा अहवाल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसाळ्यात मुंबई तुंबण्यास महापालिकेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. प्रतितास २५ मिमी पडलेल्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील गटारांची क्षमता आहे. मात्र, ही गटारे गाळाने भरलेली असल्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून नेऊ शकत नाहीत, अशी धक्कादायक बाब विधानसभेत मांडण्यात आलेल्या कॅगच्या अहवालातून समोर आली आहे.

गटारे सपाट 

गटारे, नाले सफाई नीट न झाल्याने मुंबईत पावसाचं पाणी तुंबतं असा आरोप नेहमीच केला जातो. याचं खापर महापालिकेवर फोडलं जातं. महापालिकाच मुंबईची तुुंबई होण्यास जबाबदार असल्याचं आता कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. कॅगने अहवालात म्हटलं की, मुंबईतील गटारे ही उतरती नसून ती सपाट बांधण्यात आली आहेत. त्यामुळे  समुद्राला भरती आणि ओहोटी आल्यावर समुद्रातून येणारी घाण आणि गाळ या गटारांमध्ये साचून राहतो. शहरातील पाणी समुद्रात नेणारी गटारेही समुद्र पातळीच्या बरीच खाली आहेत.

तीनच गटारांना दरवाजे

मुंबईतून पाणी बाहेर काढणाऱ्या ४५ गटारे आहेत. मात्र यातील अवघ्या तीनच गटारांना दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर आत येते. काही मोठ्या नाल्यांमधून केबल्स आणि छोट्या पाईपलाईन जात असल्याने त्याचाही पाणी वाहून जाण्यास अडथळा येत आहे.  नाल्यांच्या दुरुस्तीकडेही मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे, असंही कॅगने आपल्या अहवालात म्हटलं आहे. 

नाल्यांची रचना अयोग्य

मुंबतील नाल्यांची रचनाही अयोग्य असल्याने पाणी योग्य प्रकारे वाहून जाऊ शकत नाही. शहरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडूनही त्यावर ठोस उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. यासाठी जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडियाने महापालिकेला उपयोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मात्र, महापालिकेने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं असल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे.


हेही वाचा -

उशीरा सुचलं शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द, ठाण्यात चेंगराचेंगरीत २ महिला बेशुद्ध

रस्त्यांनीही धोका दिला, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांची ७ किमी रांग


पुढील बातमी
इतर बातम्या