झवेरी बाजारात इमारत दुर्घटना, 2 कामगारांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या झवेरी बाजार परिसरातील चिप्पी चाळ नावाच्या इमारतीच्या जिन्याचा भाग शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे फिरोज वहाब खान (२३) आणि सफर उल हक (२६) अशी आहेत. सोबतच आणखी एका कामगाराला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

दुरूस्तीचं काम सुरू

झवेरी बाझार परिसरात असलेली चिप्पी चाळ या इमारतीत दुरुस्तीचं काम सुरु होतं. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक इमारतीतील जिना कोसळला आणि खाली काम करणारे मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं.

७ मजूर सुखरूप

घटना घडताच ७ मजुरांनी पळ काढल्याने ते बचावले. परिसरातील छोट्या आकाराच्या गल्ल्यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. जेसीबी मशीनने काम कारणं देखील कठीण होत हाेतं.

जीर्ण इमारत

चिप्पी चाळ ही इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारत आहे. १०१ क्रमांकाची ही इमारत जीर्ण झाली होती. या इमारतीत ४१ गाळे होते, त्यात ३७ अनिवासी आणि ४ निवासी गाळ्यांचा समावेश होता. २०१६ मध्ये म्हाडाने या इमारतीच्या दुरूस्तीचे आदेश काढले होते. मात्र रहिवासी इमारत खाली करण्यास तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने सप्टेंबरमध्ये इमारत रिकामी करून तिची दुरुस्ती सुरु करण्यात आली होती. इमारतीतील बाथरूमच्या दुरूस्तीचं काम सुरू होतं. हे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. 

चौकशी समिती स्थापन

या प्रकरणी म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कंत्राटदाराने दुरूस्ती कामादरम्यान कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली होती का? याची चौकशी करेल. 

- सुमंत भांगे, मुख्य अधिकारी, म्हाडा

पुढील बातमी
इतर बातम्या