मुंबईत उपाशीपोटी झोपणाऱ्यांसाठी 'मुंबईकर्स मोहब्बतखाना'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनेकजण जेवण झाल्यावर उरलेल्या जेवणाचं करायचं काय या विचार अन्नाची नासाडी करतात. उरलेलं जेवण कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात, तर अनेकजण कोणा गरिबाला देतात. मात्र आताच्या काळात मुंबईत उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं उरलेलं अन्न हे गरिबांना मिळावं यासाठी नेव्हर एव्हर स्लीप हंग्री (नेश) या संस्थेने ‘मुंबईकर्स मोहब्बतखाना’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यासाठी या संस्थेनं ‘मुंबईकर्स मोहब्बतखाना’ या संकल्पनेंतर्गत ‘कम्युनिटी फ्रीज’ची व्यवस्था केली आहे.

या संस्थेनं उभारलेल्या ‘कम्युनिटी फ्रीज’च्या साहाय्यानं मदत करणाऱ्यांना आणि स्वीकारणाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्याचं काम या माध्यमातून केलं आहे. कम्युनिटी फ्रीज म्हणजे अशी शीतपेटी जिथे प्रत्येकजण आपल्या घरातील खाण्यायोग्य जेवण गरजूंसाठी ठेवू शकतो आणि कोणत्याही गरजूला ते सहज घेताही येऊ शकते. ३ आठवड्यापूर्वी नागपाडा जंक्शन येथील सारवी हॉटेल, त्यानंतर ठाणे आणि शनिवारी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयासमोर डीपीज हॉटेलच्या बाहेर ही शीतपेटी ठेवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांत माटुंग्यातील बऱ्याच लोकांनी यात खाद्यपदार्थ ठेवलं. सध्यस्थितीत हा उपक्रम केवळ ३ ठिकाणी सुरू आहे. मात्र आणखी ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. केवळ शीतपेटी देऊन चालणार नाही तर त्याच्या देखभालीसाठी कुणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सेवाभावी संस्था, उपाहारगृहे, हॉटेल, मंदिरे  यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांच्याही उरलेल्या अन्नाचे व्यवस्थापन होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या