कुपरेज उद्यान दुघर्टनेचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुपरेज उद्यानात घोड्यावर स्वार असलेल्या सहा वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी आपला चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. जऱ्हाड यांनी महापालिका सभागृहात ही माहिती देऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिले आहे.

म्हणून दुर्घटनेत वाढ

कुपरेज उद्यानात सहा वर्षीय मुलीचा घोड्यावर पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेचा दाखला देत सपाचे गटनेते रईस शेख यांनी मुंबईतील सर्व उद्यान आणि मैदानातील पायवाटा आणि ट्रॅक हे नादुरुस्त अवस्थेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे दुघर्टना होऊन नागरिकांचे नाहक बळी जात असल्याची चिंता व्यक्त करत महापालिका सभेत ६६ (ब) अन्वये मुद्दा उपस्थित केला.

रईस शेख यांचा आरोप

या घटनेला महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला असताना घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आला नाही की कुणावर कारवाई केली नाही. मागील ३ वर्षांत देखभाल आणि दुरुस्तीवर हजार कोटींच्या घरात खर्च करूनही उद्यान आणि मैदानांची अवस्था बकालच असल्याचा आरोप त्यांनी केला.

या दुर्घटना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच

कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही मैदान आणि उद्यानांची योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याची खंत व्यक्त करत भाजपाचे मनोज कोटक यांनी मुंबईकरांनी नक्की कुठे पाहून चालायचं, असा प्रश्न उपस्थित केला. झाडे पडून, खड्ड्यात पडून, मॅनहोल्समधे पडून माणसे मरत आहेत. यासर्व दुर्घटना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडत असून यापुढे ज्या भागात अशाप्रकारच्या घटना घडल्यास संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित केलं जावं, अशी मागणी त्यांनी केली.

'अधिकाऱ्यांना घरी बसवा'

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या सर्व दुघर्टना घडत असून जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना घरी बसवलं जाणार नाही तोपर्यंत त्यांना धाक बसणार नाही. आजही मुंबईतील २९ उद्यान राजकीय संस्थांच्या ताब्यातच आहे. ती सर्व ताब्यात घेऊन गरीबांना तिथे प्रवेश द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीनं कामं करावी. पण तसं न करता लोकप्रतिनिधींची जर किंमतच करत नसतील त्यांना आम्ही आमचे पाणी दाखवू. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा यशवंत जाधव यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत राखी जाधव आदींनी भाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी सभागृहात बाजू मांडत प्रशासनाने सरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

परदेशींची वाट पाहून गटनेते थकले

सभागृहात हा मुद्दा उपस्थित होणार हे माहीत असतानाही उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी चर्चा संपेपर्यंत हजर राहिले नाही. त्यामुळे सर्वच गटनेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्यानाच्या देखभालीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी परदेशी हे स्थायी समितीच्या सभेत साडेतीन वाजेपर्यंत उपस्थित होते. पण त्यानंतर ४ वाजता सभागृह सुरू झालं तरी ते तिथे आले नाही. त्यामुळे अशाप्रकारे अधिकारी महापालिका सभागृहाला आणि नगरसेवकांना मानतच नसल्याची बाब समोर आली.

पुढील बातमी
इतर बातम्या