कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहराची हद्द पूर्णपणे सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी घेतला होता. त्यानुसार येत्या ८ मेपासून हा निर्णय महापालिका क्षेत्रात लागू होणार होता. परंतु हा निर्णय बुधवारी ६ मे रोजी स्थगित करण्यात आला आहे.
रुग्णांची वाढती संख्या
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ५ मे २०२० पर्यंत २२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १४७ कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६० रुग्ण हे केडीएमसी क्षेत्रातून मुंबईतील विविध भागात जाणारे आहेत. मुंबईतून शहरात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं लक्षात घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी यांनी हा निर्णय घेतला होता.
हेही वाचा- कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरची हद्द पूर्ण सील, बाहेर पडलेल्यांना पुन्हा नो एण्ट्री
हद्दीत प्रवेशाला मनाई
या निर्णयानुसार केडीएमसी हद्दीबाहेर गेल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पुन्हा हद्दीत प्रवेश दिला जाणार नव्हता. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील सरकारी, महापालिका आणि खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या नजीकच्या हाॅटेलांमध्ये करण्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली होती. परंतु कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात वेळ जात असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
सध्याच्या घडीला केडीएमसी हद्दीतून दररोज अडीच हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईतील विविध भागात जातात. या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने एक फाॅर्म जारी केला आहे. या फाॅर्ममध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
स्थगितीचं कारण
केडीएमसीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे परंतु मुंबईतील विविध आस्थापनांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची राहण्याची व्यवस्था ८ मे २०२० पासून त्यांच्या आस्थापनाजवळ करावी, अशी विनंती ५ मे २०२० रोजीच्या पत्रकान्वये करण्यात आली होती. परंतु मुंबईत वास्तव्याची व्यवस्था करण्याकरीता आस्थापनांना वेळ लागत आहे. यावर तोडगा निघेपर्यंत ८ मे २०२० रोजीचा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रतिबंधित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात येत आहे. मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला पाठवावी असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे.