पाणीपुरी खाणाऱ्या प्रत्येकाला बिस्लेरी पाणीपुरीवाला (Pani Puri) तर नक्कीच माहित असेल. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी त्याच्याकडची पाणीपुरी तर खाल्लीच असेल. त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बिस्लेरी पाणीपुरीवाला अशी ओळख असलेले मुंबईच्या रस्त्यावर नियमितपणे पाणीपुरी आणि चाट विकणारे भगवती यादव यांचं कोरोनाव्हायरस Coronavirus च्या संसर्गानं निधन झालं आहे.
दक्षिण मुंबई भागात भगवती यादव राहायचे. नेपीयन सी रोड परिसरात रस्त्यावर ते हा व्यवसाय करत. त्यांच्या निधनाचं बातमीनंतर परिसरातल्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. यासोबतच त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा निर्णय देखील घेतला. लोकांनी सहानुभूती दर्शवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या आहेत. सोशल मीडियावर आवाहन करत त्यांनी यादव यांच्या कुटुंबासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली.
व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीनं लोकांनी पाच लाख रुपयांचा फंड हे सामान्य मुंबईकर त्यांच्या लाडक्या पाणीपुरीवाल्याच्या कुटुंबीयांना आता देणार आहेत. मुंबई मिररच्या बातमीनुसार २४ तासांमध्ये त्यांनी पावणे दोन लाखाचा निधी जमा केला आहे.
भगवती यादव गेली किमान ४ दशकं मुंबईत रस्त्यावर चाट विकत होते. त्यांच्या हातची दही पुरी आणि खास बाटलीबंद पाण्यात बनवलेली पाणीपुरी प्रसिद्ध होती. सातासमुद्रावर देखील त्यांच्या पाणीपुरीची चर्चा पोहोचली आहे. परदेशातल्याही काही व्यक्तींनी या पाणीपुरीवाल्यासाठी मदत पाठवली आहे.
यादव यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांची तरुण मुलगी आणि पत्नी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर उत्तर प्रदेशात आझमगडला त्यांच्या गावी रवाना झाल्या. आमच्या घरचा कमावता धनीच गेल्यामुळे गावी येण्यावाचून पर्याय नव्हता. वडिलांवरच्या प्रेमाखातर ग्राहक निधी जमा करत आहेत. आम्हाला त्यातून थोडी मदत होईल, असं ती म्हणाली.
हेही वाचा