आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महापालिका सभागृहातही याचे तीव्र पडसाद उमटले. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत निवेदन करत आमदार कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. आमदार कदम यांचं वर्तन हे अशोभनीय असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
घाटकोपरमधील भाजपा आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुंबईतील महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असून महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभागही तेवढाचा महत्वाचा आहे. त्यामुळे महिलांमध्ये दुजाभाव केल्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने, या कृतीचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी कदम यांच्या नावाचा उल्लेख न करता केला. जे सरकार कायदे बनवते, त्याच सत्ताधारी पक्षाचे आमदार कायदा मोडत असल्याचे सांगत राजा यांनी राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल न करता त्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप केला.
अशा रावणांमुळे महिला असुरक्षित
बेटी बचाव, बेटी बढाव म्हणणारेच आता बेटी भगाव म्हणत आहेत. त्यामुळे यांच्या नावात राम असलं तरी प्रभू रामांसारखं चरित्र नाही. त्यामुळे कदम यांच्याविरोधात त्वरीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. सपाचे रईस शेख यांनी राम कदम यांचा निषेध करत यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही, असं सांगत आम्हीही सत्तेत होतो, पण असला माज कधी दाखवला नाही, असे खडे बोल सुनावले. मुंबई आता असल्या रावणांमुळे महिलांसाठी सुरक्षित राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरुच राहिलं, असंही त्यांनी सांगितलं.
तुमच्याही कुंडल्या काढू
भाजपाचे मनोज कोटक यांनी झालेला प्रकार निषेधार्ह आहे, त्याचं कुठेही भाजपा समर्थन करत नाही, असं सांगितलं. परंतु या घटनेनंतर राम कदम यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफीही मागितली आहे. त्यानंतरही जर राजकीय आखाडा केला जात असेल तर मग आम्ही तुमच्या कुंडल्या या सभागृहात काढल्याशिवाय राहणार नाही. कदम हे या सभागृहाचे सदस्य नाहीत आणि ते उपस्थित नसताना, त्यांच्याविरोधात आरोप करणं योग्य नाही. मुळातच तंदूरकांड करणाऱ्यांकडून आम्हाला शिकवणूक नको अाहे आणि ज्या पक्षाच्या आमदाराकडून नगरसेविकेवर अत्याचार होतो, त्यांनी तर यावर बोलूनच नये सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचा समाचार घेतला.
चुकीला माफी नाही
याचा समाचार घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आम्हाला राजकारण करायचं नाही, पण जे सत्य आहे आणि उघड आहे त्यावर आम्ही बोलणारच, असं ठणकावून सांगितलं. मुंबईत जनतेमध्ये उद्रेक झाला म्हणून ही चर्चा झाली. यावर कोटक यांचा समाचार घेत, आमच्याकडंही अशा प्रकारांची जंत्री असून आम्हाला कुणी धमकी देऊ नये. जे आहे ते स्वीकारायला शिका. पण चुकीला माफी नाही, असं सांगत भाजपावर चांगलाच निशाणा साधला.
...तर हातच तोडून टाकू
सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी हे नीच कृत्य करणाऱ्या आमदार राम कदम अर्थात रावण कदम यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं सांगितलं. आदल्या दिवशी हातावर राखी बांधायची आणि दुसऱ्या दिवशी राखी बांधणाऱ्या आया-बहिणींच्या अब्रूबद्दल बोलायचं हे योग्य नाही. त्यामुळे मुंबईच काय महाराष्ट्रातील एकाही मुलीला हात लावले तर हातच तोडून टाकू, असा इशारा लांडे यांनी दिला. त्यामुळे या सडक्या कांद्याला त्यांच्या पक्षानं त्वरीत बाहेर काढलं पाहिजं, असंही त्यांनी म्हटलं. तर अश्रफ आझमी यांनीही कदम आणि भाजपचा समाचार घेतला. मात्र, महापौरांनी यावर कोणतंही भाष्य न करता हे निवेदन गुंडाळून टाकलं.
हेही वाचा-
कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सुनिल भिरूड यांच्याकडं
माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या