सीएसटीवर प्रवाशांना गारेगार हवा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर नुकतेच 4 उच्च क्षमतेचे पण मंदगतीने फिरणारे (हाय व्हॉल्युम लो स्‍पीड) पंखे बसविण्यात आले आहेत. अत्यंत दूरवर हवा फेकण्याची क्षमता, ही या पंख्यांची खासियत असल्याने या पंख्यापासून लांब अंतरावर उभे असलेल्या प्रवाशांनाही गारेगार हवेचा आनंद मिळू लागला आहे.
शहरातील वाढलेल्या उकाड्यामुळे यापूर्वी सीएसटीत लोकल गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी घोळक्याने पंख्याखाली उभे असलेले दिसून येत होते. या पंख्यांची हवा फेकण्याचीही ठराविक क्षमता असल्याने प्रवासी वाऱ्याची झुळूक आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी विशिष्ट कोन साधताना दिसत होते.
वीज बचतीसोबतच टर्मिनसमधील वायूविजन सुधारण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाद्वारे उपनगरीय लोकल प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात 24 फुटांचे 4 'हाय व्हॉल्युम लो स्‍पीड' पंखे बसविण्यात आले आहेत. हवा खेळती राहण्यासोबतच या पंख्यांमुळे रेल्वेची वर्षाला 3 लाख 3 हजार 452 रुपयांची वीज बचत होणार आहे.

असे आहे पंख्याचे वैशिष्ट्य
'हाय व्हॉल्युम लो स्‍पीड' पंखे केंद्रातून तयार होणारी हवा अत्यंत दूरवर फेकतात. ही हवा चारही दिशांना 20 मीटर (1500 चौ.फू) अंतरापर्यंत पोहोचते.
हे पंखे सरासरी केवळ 810 वॅट वीज वापरतात.
त्यामुळे 80 टक्के वीजेची बचत होते.
हवेची समान पद्धतीने वितरण होते.
अत्यंत कमी आवाज असल्याने ध्वनी प्रदूषण होत नाही.
पंख्याच्या देखभालीसाठी अत्यंत कमी खर्च येतो.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील म्हणाले, सुरूवातीच्या टप्प्यात आम्ही सीएसटीवर प्रायोगिक तत्त्वावर एक 'हाय व्हॉल्युम लो स्‍पीड' पंखा बसवला होता. यामुळे वीजेची बचत तर झालीच, पण प्रवाशांनीही या नव्या पंख्याचे कौतुक केले. त्यानंतर जुने 24 पंखे हटवून तेथे नवे 'हाय व्हॉल्युम लो स्‍पीड' पंखे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वीज बचतीसोबतच ध्वनी प्रदूषणास आळा घालता येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या