डेब्रिजने अडवला 'एन' विभागातील रहिवाशांचा रस्ता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तानसा जलवाहिनीच्या 10 मीटर परिसरातील बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार मागील काही दिवसांत पालिकेच्या 'एन' विभागाने कातोडीपाडा, खंडोबा टेकडी आणि राम नगर येथील डक लाईन परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करत 1 हजार 938 अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र या कारवाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिज तयार झाले आहे. यातील बहुतांश डेब्रिज रस्त्यातच पडून असल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या डेब्रिजचा सर्वाधिक त्रास जय मल्हार, सेवा नगर, कुंभार चाळ, वर्षानगर, राहुल नगर, रामनगर आणि प्रियदर्शनी सोसायटीतील रहिवाशांना होत आहे. या विभागात कारवाई झाली नसली तरी येथून घाटकोपर स्थानक, साकीनाका, खैराणी रोड, भटवाडी आणि संत मुक्ताबाई रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

डेब्रिज उचलण्याचे कंत्राट देण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात होईल. विभागातील पाणी आणि रस्त्याच्या समस्येवर पालिका लवकरच उपाययोजन करणार आहे.

- नरेंद्र बर्डे, उपायुक्त, 'एन' विभाग

यामुळे रहिवाशांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. या कारवाईमुळे येथील जल वाहिन्या तुटल्या असून काही भागातील पाणीपुरवठा बंद झाल्याचे स्थानिक रहिवासी मारुती साळसकर यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या