मुंबईत जकात लुटो

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत येत्या जून महिन्यापासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार असून त्यामुळे सध्या महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणारी जकात बंद होणार आहे. त्यामुळे जकात अजून तीन महिने वसूल केला जाणार असल्यामुळे ती महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याऐवजी महापालिकेचे अधिकारी स्वत:च्याच खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे जकात लुटो असाच प्रकार सुरू असल्यामुळे याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे जकात नाक्यांवरील गैरप्रकारावर प्रशासनाचे लक्ष वेधले. भांडुपमधील काँग्रसेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांनी जकात चुकवून जाणाऱ्या गाड्या अडवून त्या पकडून दिल्या. तब्बल दोन कोटींचा माल पकडून दिल्यानंतरही संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे याप्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली. पुढील दोन ते तीन महिन्यात जकात बंद होणार आहे, त्यानंतर या बंद होणाऱ्या जकात नाक्यांच्या जागांवर प्रशासन काय करणार आहे, याची काही उपाययोजना आखली गेली का, अशी विचारणा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. सर्व जकात नाक्यांच्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये याची उपाययोजना आखतानाच त्याठिकाणी वाहतुकीसाठी ही जागा खुली करून दिली जावी किंबहुना ती सुशोभित करण्यात यावी,अशी सूचना केली. त्यानुसार समिती अध्यक्ष रमेश कोरगावर यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

सह आयुक्त व्ही राधा यांच्या काळात जकातीचे उत्पन्न सात हजारांवर पोहोचले होते. ते आजही कायम आहे, त्यात वाढ झालेली नाही, जकात वसुलीबाबतची मानसिकता बदलली गेली पाहिजे. मुलुंड जकात नाक्यामुळे टोल नाका मुंबईच्या हद्दीत आणला गेला आहे. त्याचा फटका हरिओम नगरवासियांना बसत आहे. त्यामुळे जकात बंद झाल्यानंतर टोल नाका जकात नाक्याच्या ठिकाणी हलवला जावा. जेणेकरून मुंबईच्या हद्दीत राहणाऱ्या जनतेला टोल भरावा लागतो, तो भरावा लागणार नाही.
प्रभाकर शिंदे, नगरसेवक, भाजपा

पुढील बातमी
इतर बातम्या