खंडाळ्यातील शेतकरी मंत्रालयात, तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या दहा वर्षांपासून भूसंपादनाला विरोध करत आपल्या मागण्यांसाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणाऱ्या सातारा, खंडाळ्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे शेवटी खंडाळ्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा ते मंत्रालयात असा अर्धनग्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी खंडाळ्यातून अर्धनग्न अवस्थेत खंडाळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले. २५० किमीहून अधिक पायपीट करून मुंबईच्या वेशीवर, मानखुर्दमध्ये आल्याबरोबर रविवारी सकाळी या मोर्चाला पोलिसांनी अडवलं. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, त्यांनी रविवारचा दिवस आणि रात्र मुंबईत काढत अखेर सोमवारी शेतकर्यांचं सहा जणांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी मंत्रालयात दाखल झालं आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करू असं सांगत हे शिष्टमंडळ चर्चेसाठी गेलं आहे. त्यामुळे आता चर्चेत नेमकं काय होत याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेतकऱ्यांची घोर फसवणूक

खंडाळ्यातील एमआयडीसीसाठी संपादीत केलेल्या जमीनीच्या संपादनामध्ये शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे आपल्याला न्याय द्यावा असं म्हणत या शेतकऱ्यांनी खंडाळा ते मंत्रालय असा अर्धनग्न मोर्चा आयोजित केला आहे. रविवारी मोर्चाला अडवल्यानंतर प्रसारमाध्यमांनी गांभीऱ्यानं या मोर्चाची दखल घेतल्यानंतर अखेर सरकारला जाग आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. रविवारची रात्र त्यांनी चेंबुरमधील साधू वासवानी हायस्कुलमध्ये काढली.

शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल 

सरकारच्या आश्वासनानुसार सोमवारी १२ वाजता सहा जणांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालं आहे. उद्योगमंत्री आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता या चर्चेत काय तोडगा निघतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा -

संभाजी ब्रिगेडची 'ठाकरे'ला धमकी

मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तु तु मैं मैं


पुढील बातमी
इतर बातम्या