Exclusive: धक्कादायक! आरेतल्या 'त्या' जागेवर ११ वर्षांत ३० वेळा लागली आग

आरे काॅलनीतील एका खासगी प्लाॅटवर ९ दिवसांपूर्वी भीषण आग लागली. ही आग नैसर्गिकरित्या नव्हे, तर जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून होत होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही हाच संशय व्यक्त केला होता. अखेर हा संशय खरा ठरला आहे. अग्निशमन विभागाने तयार केलेल्या या आगीच्या चौकशीच्या अहवालात आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

हा अहवाल 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागला असून या अहवालातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे ज्या ठिकाणी ९ दिवसांपूर्वी आग लागली त्या ठिकाणी ११ वर्षांत, २००७ ते २०१८ दरम्यान तब्बल ३० वेळा आग लागली आहे. त्यामुळं या ठिकाणी जाणीवपूर्वक आग लावली जात असून संबंधित यंत्रणांचंही आग लावणाऱ्यांना अभय असल्याचं म्हणत सेव्ह आरे आणि सेव्ह ट्रीसारख्या संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

४ किमीपर्यंत पसरली आग

गोरेगाव पूर्वकडील आरेतील डोंगरावर गेल्या आठवड्यात आग लागली. ही आग ४ किलोमीटर पसरत गेली आणि ही आग आरेतील वनसंपदा धोक्यात आणते की काय? अशी भीती निर्माण झाली. पण ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून या आगीची चौकशी करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल नुकताच समोर आला आहे.

संशयास्पद वावर

चौकशीत ही आग कुणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचं स्पष्ट झालं आहे. हा डोंगर, ही जागा प्रतिबंधित असताना, इथं कुणालाही जाण्यास मज्जाव असताना या ठिकाणी काही लोकांचा वावर झाल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी या ठिकाणी अर्धवट जळालेले टायर्स, बाटल्या आणि प्लास्टिकही आढळून आलं आहे. हे सर्व संशयास्पद असून कुणीतरी याठिकाणी आग लावल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे अग्निशमन दलानं पोलिसांना या प्रकरणाचा पुढील तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जंगल वाढू नये म्हणून

दरम्यान या अहवालातून या ठिकाणी गेल्या ११ वर्षांत ३० वेळा आग लागल्याची बाब समोर आली आहे. २९ वेळा लेव्हल १ ची तर १ वेळा लेव्हल ३ ची आग लागली आहे. हा भाग नॅशनल पार्कला लागून आहे. हा भाग खासगी मालकाच्या ताब्यात असला तरी तो प्रतिबंधित असून तिथं जंगल वाढू नये, त्या जागेचं रूपांतर जंगलात होऊ नये म्हणून या ठिकाणी लाग लावली जात असल्याचा आरोप सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी कडक कारवाई करत अशा घटनांना रोखलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या अहवालानुसार आता पोलिस आणि वनविभाग नेमकी काय कारवाई करतेय़ ही आग कुणी आणि का लावली हे समोर येत का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.


हेेही वाचा-

आरेतील आग जाणीवपूर्वक लावलेली, दिंडोशी वनधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा

निष्काळजीपणा! ३ वर्षात ३ हजार सोसायट्यांना अग्निशमन दलाच्या नोटीसा


पुढील बातमी
इतर बातम्या