पालघर हत्याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार- अनिल देशमुख

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर येथील गडचिंचले गावात दोन साधू आणि एका ड्रायव्हरची जमावाने काही दिवसांपूर्वी हत्या केली होती. त्या घटनास्थळाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी अचानक भेट दिली आणि तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केली. या प्रकाराचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचं यावेळी देशमुख यांनी सांगितलं.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होत. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरण, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदी उपस्थित होते.

हेही वाचा- परप्रांतीयांना स्वत:च्या राज्यात न घेणं हा प्रकार पालघर हत्याकांडाइतकाच निर्घृण- शिवसेना

पोलीस अधिक्षकाचं निलंबन

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली असल्याचं सांगितलं. याप्रकरणी याआधी कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंं होतं.

काय आहे प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. 

ही घटना पोलिसांच्या डोळ्यादेखत झाल्याने विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरू केली. शिवाय याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती.  

हेही वाचा- धक्कादायक! पालघर हत्याकांडातील एका आरोपीला झाला कोरोना

दरम्यान, लॉकडाऊन काळात विनाकारण वाहनासह फिरणाऱ्यांकडून ३ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ५३ हजार ३३० वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच जिल्हा बंदी असताना जे लोक दुधाची गाडी, टँकर, सिमेंट मिक्सर किंवा इतर वाहनाने प्रवास करत होते अशा १२८१ अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील देशमुख यांनी यावेळी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या