मंगळवारी भाईंदर (पश्चिम) (bhayandar) येथील कम्युनिटी हॉलच्या शेजारी असलेल्या मांडली तलावात (lake) असंख्य मासे मृतावस्थेत आढळले. तेथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हे दृश्य पाहताच धक्का बसला.
प्लॅस्टर-ऑफ-पॅरिस (PoP) मुर्तींच्या विसर्जनासह फुलांचा कचरा, धार्मिक विधींचे अवशेष, घाण आणि प्लास्टिकच्या पिशव्या एकत्रितपणे तलावात टाकली गेली. यामुळे तलावात प्रदुषण होऊन ऑक्सिजनच्या पातळीत तीव्र घट झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जलचरांचा नाश होणे ही सर्वात मोठ्या चिंतेची बाब आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) स्वच्छता विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृत मासे (dead fish) काढण्याचे काम सुरू केले असले तरी, तलावातील एकूण जलचरांचे आणि पाण्याच्या गुणवत्तेचे अद्याप मूल्यांकन करणे बाकी आहे. आरोग्याला घातक ठरणाऱ्या मृत माशांचा कुजलेला ढीगही नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करताना पर्यावरणवादी धीरज परब म्हणाले, “न्यायालयीन आदेश आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले सल्ले असूनही, नैसर्गिकरित्या विषारी प्रदूषण करणाऱ्या नॉन-बायोडिग्रेडेबल पीओपी मूर्तींचे विसर्जन रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे.”
मीरा-भाईंदर शहरातील 21 विसर्जन तलावांपैकी एक असलेल्या या तलावात यंदा गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 396 मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यापैकी 281 मूर्ती पीओपीच्या होत्या ज्या तलावाच्या तळाशी साचल्या आहेत.
11 दिवसांच्या उत्सवात तलावात विसर्जित केलेल्या पीओपी मूर्तींची संख्या हळूहळू 600 च्या पुढे गेली आहे. याव्यतिरिक्त, पेंटमध्ये वापरण्यात येणारी हानिकारक रसायने देखील तलाव प्रदूषित करतात.
अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, विसर्जन प्रक्रियेनंतर ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होणे हे सागरी जीवांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. PoP मूर्ती सहज विरघळत नाहीत आणि जास्त काळ पाण्यात राहतात. तर त्यातील विषारी पेंट्समध्ये रसायने असतात जी पाण्याच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन रोखणारे थर तयार करतात, त्यामुळे सागरी जीवनावर (marine life) घातक परिणाम होत आहे.
हेही वाचा