मुंबईत २९९ ठिकाणी दरडीवर वसाहती असून त्यापैकी ६० वसाहती या धोकादायक परिस्थितीत, तर २० वसाहती अतिधोकादायक परिस्थितीत आहेत. मुलुंड टेकड्यांवर देखील हीच परिस्थिती आहे.
मुलुंड टेकड्यांवरील सुमारे ४ हजार कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहेत. या कुटुंबांवर भूस्खलनाची टांगती तलवार लटकत आहे. राज्य सरकार भूस्खलन रोखण्यासाठी तटबंदी बांधत आहे. पण तटबंदीसाठी संपूर्ण निधीची रक्कम अद्याप मंजूर केत नाही.
भाजपचे आमदार मिहीर कोटेचा म्हणाले, २०१९ मध्ये म्हाडानं भांडुप आणि मुलुंडमधील उतारांवर अंदाजे १०.५ कोटी रुपये दरीची तटबंदी बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु केवळ १.३ कोटी रुपये मंजूर झाले आणि भिंतीचा एक छोटासा भाग बांधला गेला.
मुलुंडमधील राहुल नगर, न्यू राहुल नगर, शंकर टेकडी, अमर नगर, हनुमान पाडा आणि खिंडी पाडा या भागात सर्वाधिक धोका आहे.
“२० हजार रहिवाशांना फक्त भूस्खलनाचा नाही, तर जुन्या जागेच्या भिंतचा धोका देखील आहे. अनेक ठिकाणी भिंत नाही आणि काही भागात अस्तित्त्वात असलेली भिंत जीर्ण झाली आहे. ती पुन्हा बांधली जावी किंवा पुन्हा मजबूत करावी लागेल, असं कोटेचा म्हणाले.
“आम्ही जिल्हा नियोजन आणि विकास समितीसमोर (डीपीडीसी) हा मुद्दा उपस्थित करीत आहोत, मात्र अद्याप भिंतीसाठी निधी मंजूर झालेला नाही.”
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि डीपीडीसीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले की, राखीव भिंती बांधण्याचं काम प्राधान्यानं केलं जात आहे.
"वर्षानुवर्षे भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षण भिंतीची मागणी केली जात आहे. परंतु ती पूर्ण झाली नाही. डिसेंबर २०१९ पासून आम्ही राखीव भिंती बांधण्यास प्राधान्य देत आहोत. गेल्या वर्षी निवेदनांसाठी सर्व उपलब्ध निधी देण्यात आला होता. यावर्षीही मी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना निधी वितरित करण्याचे सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे.”
ठाकरे पुढे म्हणाले, “पेडर रोड, चेंबूर आणि भांडुप इथं नुकत्याच झालेल्या भूस्खलनांमध्ये पाण्याचे आणि चिखलामुळे मजबूत भिंतीही पडल्या.”
२०१० च्या म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळानं आणि पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, जवळजवळ १ लाख कुटुंबे मुंबईच्या डोंगराच्या उतारावर राहत होती, त्यातील सुमारे २२ हजार ४८३ धोकादायक किंवा असुरक्षित क्षेत्रांमध्ये आहेत.
गेल्या आठवड्यात, अतिवृष्टीनंतर माहुल आणि विक्रोळी इथं दोन भूस्खलनाच्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये महापालिकेनं दावा केला की, त्यांनी झोपडपट्टीधारकांना इशारा दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
हेही वाचा