कल्याण डोंबिवली पालिकेकडून ४२ बांधकामं जमीनदोस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून गुरूवारी ४२ बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली.  कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत १०० फुटी रस्त्यात ही बाधित ४२ बांधकामं येत होती. या कारवाईद्वारे पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला.

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त (ड प्रभाग) अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र परिसरात, कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई काल ५/ड प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उप अभियंता प्रशांत भुजबळ यांनी ५/ड व ४/जे प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकामार्फत व महानगरपालिकेच्या पोलिस पथकाच्या सहकार्याने केली.

या रस्त्याची लांबी २.४ किलोमीटर असून रुंदी ३० मीटर(१०० फूट) आहे. हा रस्ता पूना-लिंक रस्त्याला समांतर रस्ता असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पूना-लिंक रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तसंच महापालिकेच्या ९/आय प्रभागातील, पिसवली परिसरातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी आय प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथक व पोलिस पथक यांच्या सहाय्याने बुधवारी दिवसभरात १० अनधिकृत बांधीव जोते व ८ अनधिकृत रुम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.


हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?


पुढील बातमी
इतर बातम्या