मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं प्रगतीपुस्तक ‘प्रजा फाऊंडेशन’च्यावतीनं जाहीर करण्यात आलं अाहे. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नगरसेविकाच झळकल्या आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला अाहे. तर काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर दुसऱ्या आणि भाजपाच्या प्रिती सातम तिसऱ्या क्रमांकांवर अाहेत. प्रजा फाऊंडेशननुसार काँग्रेस पक्ष हा महापालिकेतील सर्वोकृष्ट पक्ष ठरला आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवीन नगरसेवकांचं पहिलं प्रगतीपुस्तक ‘प्रजा फाऊंडेशन’च्यावतीनं प्रसिध्द करण्यात आलं. ‘प्रजा फाऊंडेशन’चे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता व संचालक मिलिंद म्हस्के यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिध्द केलेल्या प्रगतीपुस्तकामध्ये पहिल्या आर्थिक वर्षांत चांगल्या प्रकारची कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांची दखल घेण्यात आली. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये नगरसेविकांनी बाजी मारली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर (८१.५८ टक्के), काँग्रेसच्या बोरीवली येथील नगरसेविका श्वेता कोरगावकर (७९.२२ टक्के) आणि भाजपाच्या गोरेगाव येथील प्रीती सातम (७९.१२ टक्के) यांचा समावेश आहे.
शाहनवाज शेख फेल
एमआयएमचे शाहनवाज शेख यांची कामगिरी सर्वांत निकृष्ट ठरली आहे. शेख यांना (२७.८० टक्के) गुण मिळाले अाहेत. त्याखालोखाल भाजपाच्या केशरबेन पटेल (३३.१९ टक्के) आणि सपाच्या गुलनाझ कुरेशी (३३.५६ टक्के) यांना सर्वांत कमी गुण मिळाले आहेत. मुंबईत नगरसेवकांनी बजावलेल्या कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली आहे. त्यासाठी पालिका व समिती बैठकीला असलेली त्यांची हजेरी, सर्व महापालिका बैठकांमध्ये त्यांनी विचारलेले एकूण प्रश्न, अर्थसंकल्पाचा वापर, शैक्षणिक पात्रता, आयकर विषयक अहवाल, मतदार संघात असलेली त्यांची प्रतिमा आणि मतप्रवाह यासर्वांच्या आधारे हा क्रम ठरवण्यात आल्याचे प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी स्पष्ट केलं.
मागील वर्षभरात काँग्रेस पक्ष हा महापालिकेत प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यांच्या पक्षाचे नेते हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे वर्षभरातील कामगिरीच्या आधारे घेतलेल्या नोंदीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाने (६०.२५ टक्के) गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल भाजपा (६०.३१ टक्के) आणि शिवसेनेने (६०.२५ टक्के) गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सध्याच्या नगरसेवकांचे सरासरी गुण ५६.६ टक्के असून हा आकडा नगरसेवकांचा यापूर्वीचा कार्यकाळ (२०१३-१६) च्या तुलनेत ( ५९.५ टक्के) आसपासच आहे. या प्रगतीपुस्तकात नगरसेवकांविरुद्ध असलेल्या गुन्हेविषयक नोंदीचा विचार करण्यात आला आहे. सन २०१३-१६ च्या कालावधीत ४९ नगरसेवकांवर गुन्हेगारी स्वरुपाच्या तक्रारी होत्या. त्या तुलनेत डिसेंबर २०१७ पर्यंत ३७ नगरसेवकांच्या नावावर गुन्हेविषयक तक्रारींची नोंद असल्याचं आढळून आल्याचं त्यांनी या अहवालात म्हटलं आहे.
टॉप फाईव्ह नगरसेवक
शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर (८१.५८ टक्के),
काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर (७९.२२ टक्के)
भाजपाच्या नगरसेविका प्रीती सातम (७९.१२ टक्के)
शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर (७८.६२ टक्के)
शिवसेना नगरसेवका समाधान सरवणकर (७८.१३ टक्के)
विरेाधी पक्षनेते रवी राजा ( १३ वा क्रमांक)
सभागृहनेत्या विशाखा राऊत ( १४१ वा क्रमांक)
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (६ वा क्रमांक)
उपमहापौर हेमांगी वरळीकर (१०५ वा क्रमांक)
सपा गटनेते रईस शेख ( १२ वा क्रमांक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राखी जाधव (५९ वा क्रमांक)
भाजपा गटनेते मनोज कोटक (५७ वा क्रमांक)
बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर (६३ वा क्रमांक)
सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे (१०१ वा क्रमांक)
हेही वाचा -
म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!
११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी; पण तारीख काही ठरेना