कफ परेडमधील फुटपाथ उजळणार, एलईडी लाईट्स उभारणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कफ परेड भागात लवकरच एलईडी लाईट्स लावण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) हा उपक्रम लवकरच राबवणार आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकल्पाला पालिकेकडून निधी आणि मंजुरी दिली जात आहे. तर बेस्टचे अभियंते त्याची अंमलबजावणी करत आहेत. बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, नियोजनाचे काम त्यांच्याकडून केलं जात होतं जे नंतर पालिकेनं अधिकृत केलं.

“आम्ही कफ परेडमधील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर रस्त्यालगत ३० खांब उभारले आहेत. आमचे प्राथमिक उद्दिष्ट ४१ खांब उभारण्याचे होते. परंतु मेट्रोचे काम चालू असल्यानं यापैकी काही खांब उभारता आले नाहीत,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हा प्रकल्प भाजपच्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी प्रस्तावित केला आहे. HT शी बोलताना हर्षितानं सांगितलं की, सूर्यास्तानंतर अंधारात फुटपाथांवर होणाऱ्या गैरकामांवर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना अधिक पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनवण्यासाठी रहिवाशांनी तिच्याशी संपर्क साधला.

"सर्व दिवे रस्त्याच्या दिशेनं निर्देशित केले जातात त्यामुळे फुटपाथ अंधारात आहेत आणि लोकांना त्यावर चालण्याची भीती वाटते," असं हर्षितानं शेअर केलं.

टप्प्याटप्प्यानं संपूर्ण ‘अ’ प्रभागात हे दिवे लावण्यात येणार असल्याचं मकरंद नार्वेकर यांनी सांगितलं. “मला वाटत नाही की अशा प्रकारची अनोखी योजना शहरात इतरत्र कुठेही राबवली आहे. फूटपाथ प्रकाशित केल्यानं केवळ पादचाऱ्यांना त्यावर चालण्यास प्रोत्साहन मिळणार नाही तर यामुळे वाहतुकीचा प्रवाहही सुधारेल,” मकरंद म्हणाले.

१९७५ पासून या भागात राहणारे रहिवासी हरेश हाथीरामानी यांनी सांगितलं की, कफ परेड परिसरात यापूर्वी चोरी, दरोड्याच्या घटना घडल्या असल्यानं या दिव्यांची खूप गरज होती. "व्यावसायिक जिल्हा असल्यानं, संपूर्ण कफ परेड परिसरातील बहुतेक भाग रात्रीच्या वेळी निर्मनुष्य होतात. ज्यामुळे याआधीही अनेकदा दरोडे आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत."


हेही वाचा

महापालिका ३ वर्षांत पेग्विन देखभालीसाठी करणार १५ कोटींचा खर्च

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढे ढकलणार?

पुढील बातमी
इतर बातम्या