महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावणार की निर्बंध आणखी कडक करणार? अशा चर्चा रंगलेल्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी पुढील १५ दिवसांसाठी असेल. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सक्त मनाई असेल. संचारबंदीची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेजही जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.
आॅक्सिजन, इंजेक्शनची कमतरता
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. आधीच्या लाटेपेक्षाही कोरोनाची दुसरी लाट अधिक भीषण आहे. राज्यात मागील काही दिवस दररोज ५० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. मधल्या काळात उभारलेल्या आराेग्य सुविधाही आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आॅक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनही कमी पडू लागले आहेत. ही स्थिती लक्षात घेता कोरोना संसर्गाची साखळी आपल्याला तोडावीच लागेल.
आता निर्णय घेण्याची वेळ
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको म्हणून एमपीएससी तसंच दहावी व बारावीच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या. मात्र कोरोनाची परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. ती परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हावीच लागेल. मी गेल्या काही दिवसांपासून समाजातील प्रत्येक घटकाशी चर्चा करत आहे. त्यांच्याशी संवाद साधून एकमत करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात अनेक मतप्रवाह आहेत. मतमतांतरे देखील आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
कलम १४४ लागू
आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठीच बुधवारी संध्याकाळी ८ वाजल्यापासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. त्यानुसार राज्यात १४४ कलम लागू होईल. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. याकाळात अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. पंढरपूर मंगळवेढ्यात निवडणूक असल्याने मतदान झाल्यावर तिथं देखील हे निर्बंध लागू होतील. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.