रविवारी सकाळी मानखुर्दजवळ भंगाराच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. सकाळी सहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं.
अग्निशमन दलाचे १२ फायर इंजिन आणि ८ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम सुरू असून अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार ही लेव्हल ४ ची आग आहे. मानखुर्दच्या भंगार मार्केटमध्ये हे दुकान आहे. दरम्यान, आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी वांद्रेमध्ये अशाच प्रकारे बांधकाम सुरू असलेल्या रूस्तुमजी सीजन इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. बांधकामासाठी वापरण्यात येणारं लाकूड पेटल्यामुळे ही आग लागली होती.