मुंबईत सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई; महापौरांचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे. यानुसार मुंबईतील दुकान ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्र, त्यांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांनी एसी सुरु ठेवल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ४ वाजेपर्यंत सुरु असतील. मात्र त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नाही. एसीच्या माध्यमातून विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर एसी सुरु असला तर त्यांनी दंडही होऊ शकतो. मुंबईत रात्री ८ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरु राहील असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मुंबईतील मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असतील. लोकल ट्रेन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासांठी सुरु असून बसमध्येही फक्त बसून प्रवाशाची परवानगी आहे. उभं राहून प्रवास करण्यास मनाई आहे. पाचव्या स्तरातून येणाऱ्या खासगी वाहनांना मुंबईत परवानगी नसेल. हॉटेल, रेस्टाँरट यांना ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ४ नंतर त्यांना पार्सल सेवा सुरु ठेवता येईल. अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

एवढ्या मोठ्या लॉकडाउननंतर आपण अनलॉक करत असताना काही नियम पाळले पाहिजेत. लोकांनी स्वयंशिस्त लावून घेतली तर पूर्ण अनलॉक होईल आणि मुक्त कारभार करु शकू. असा विश्वास महापौर पेडणेकर व्यक्त केला आहे.



हेही वाचा - 

  1. इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

पुढील बातमी
इतर बातम्या