दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील 218 रहिवासी अजूनही मृत्यूच्या सावटाखाली रहात आहेत. पावसाळ्यात धोकादायक-अतिधोकादायक इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. असे असतानाही म्हाडाच्या मुंबई दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अद्यापही येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केलेले नाही.
''या 218 रहिवाशांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थलांतरीत करण्यात येईल. रहिवाशांनी त्याला नकार दिल्यास पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने रहिवाशांना स्थलांतरीत केले जाईल'', असा दावा खुद्द गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंडळाच्या पत्रकार परिषदेत 18 दिवसांपूर्वी केला होता. पण हा दावा साफ फोल ठरला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्याची डेडलाईन संपली असून मागील 18 दिवसांत एकाही रहिवाशाचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले नसल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मंडळाच्या या उदासीन कारभारामुळे यापैकी एखादी इमारत कोसळली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरवर्षीप्रमाणे मंडळाने उपकरप्रात इमारतींचे सर्वेक्षण करत 9 अतिधोकादायक इमारतींची यादी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली. त्यानुसार 9 इमारती अतिधोकादायक जाहीर करत त्यातील रहिवाशांना स्थलांतरासंबंधीच्या नोटिसा पाठवल्या. दरम्यान, या 9 इमारतीतील 500 पैकी केवळ 218 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. त्यानुसार मंडळाने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करू, असे जाहीर केले होते.
स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू असून रहिवासी स्थलांतरीत होत नसल्याने त्यांची पाणी आणि वीज जोडणी तोडण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांना तशा नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही रहिवासी स्थलांतरीत झाले नाहीत, तर त्यांना जबरदस्तीने स्थालांतरीत करू.
- सुमंत भांगे, मंडळाचे मुख्य अधिकारी
पण म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेलो की, पुन्हा हक्काच्या घरात कधी परतू याचे उत्तर कुणाकडेही नसल्यामुळे अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशी म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जाण्याएवजी जीव मुठीत घेऊन जगणेच पसंत करत आहेत. या पार्श्वभूमीवर मंडळासह वायकर यांनी रहिवाशांचा जीव महत्वाचा असल्याचे सांगत जबरदस्तीने, पोलिस बंदोबस्तात रहिवाशांना स्थलांतरीत करु, असे जाहीर केले होते.