अर्ज भरण्यासाठी गिरणी कामगारांना हवीय मुदतवाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गिरण्यांच्या जमिनीवरील घरांसाठी अर्ज भरु न शकलेल्या गिरणी कामगारांना म्हाडाने आणखी एक संधी दिली असून, सध्या अशा गिरणी कामगारांचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी गिरणी कामगारांच्या हातात केवळ 10 दिवस उरलेले आहेत. तरीही, तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच कामगारांनी अर्ज भरलेले नाहीत. तर खेड्या-पाड्यात विखुरलेल्या कामगारांपर्यंत अर्ज भरून घेण्यात येत असल्याची माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे अशा गिरणी कामगारांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कामगारांकडून पुन्हा होऊ लागली आहे.

याआधी बँकेच्या माध्यमातून लिखित अर्ज भरून घेण्यात आले होते. आता मात्र आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. बहुतांश गिरणी कामगार अशिक्षित असल्याने, त्यांना संगणकीय ज्ञान नसल्याने आॅनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, अर्ज भरण्यासही विलंब होत आहे. त्यातच अर्जासोबत 150 रुपयांची रक्कमही आॅनलाईन क्रेडिट कार्डने भरायची असल्याने कामगारांकडे क्रेडिट कार्ड नसल्यानेही त्यांना ही रक्कम भरण्यात अडचण येत आहे. अशा तांत्रिक अडचणींमुळे दहा दिवस उरलेले असतानाही हजारो कामगार अर्ज भरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी गिरणी कामगार कल्याणकारी संघासह कामगारांनी केली आहे.

शनिवारी गिरणी कामगार एकजुटीची बैठक होणार आहे. या बैठकीत ही मागणी म्हाडासमोर ठेवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती कल्याणकारी संघाकडून देण्यात आली आहे. बैठकीत ही मागणी झाल्यास म्हाडा त्यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पुढील बातमी
इतर बातम्या