आरेमधील वृक्षतोडीला राज ठाकरे, लतादिदींचा विरोध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तब्बल २७०० झाडं तोडली जाणार आहेत. परंतु, आरे कॉलनीतील या वृक्षतोडीला अनेकांनी विरोध केला आह. यामध्ये कलाकारांचाही समावेश आहे. अशातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला असून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही विरोध केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली असून, 'आरेमधील वृक्षतोड निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे' असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, राज ठाकरे यांचा आवाज असलेला एक व्हिडिओ मनसेनं ट्विट केला आहे.

पार्कचं उदाहरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जंगलामुळं किंवा एखाद्या पार्कमुळं शहराचं, राज्याचं आरोग्य कसं चांगलं राहू शकतं याबाबत म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मॅनहटन येथील एका पार्कचं उदाहरण दिलं. 'न्यूयॉर्कमध्ये पार्क उभारावं लागलं. आपल्याला निसर्गानं हा ठेवा दिला आहे, मात्र आपणच त्याचा ऱ्हास केला आहे. बिबळ्या घरात शिरला असं आपण म्हणतो पण तसं नाही आपण त्याच्या घरात शिरलो आहे' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वन्यजीव धोक्यात

'मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २७०० झाडं कापण्यात येणार आहेत. त्यामुळं अनेक वन्यजीव धोक्यात येणार आहेत मी या वृक्षतोडीचा निषेध करते', असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटलं.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील एक ट्विट करून वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयावर टीका केली आहे.


हेही वाचा -

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळं मुंबईकरांच्या जीवाचे हाल


पुढील बातमी
इतर बातम्या